Join us

आयडीबीआयमध्येही कोट्यवधींचा घोटाळा, तपास सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 4:05 AM

आयडीबीआय बँकेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांतील पाच शाखांमधील ७७२ कोटी रुपयांचा बोगस कर्जांचा घोटाळा समोर आला

नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांतील पाच शाखांमधील ७७२ कोटी रुपयांचा बोगस कर्जांचा घोटाळा समोर आला असून, त्यामुळे या बँकेचे समभाग बुधवारी घसरले. यातील दोन प्रकरणांचा तपास सीबीआयने सुरूही केला आहे.आयडीबीआय बँकेनेच या घोटाळ्याची माहिती मंगळवारी रात्री माध्यमांना दिली. बँकेने म्हटले आहे की, सन २00९ ते २0१३ या काळात मत्स्यपालनासाठी देण्यात आलेल्या काही कर्जांसाठी सादर करण्यात आलेली भाडेपत्राची कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. कागदांवर दाखविण्यात आलेले मत्स्यपालन जलाशय प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचेही समोर आले आहे. ही कर्जे घेताना बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तांचे मूल्यही मोठ्या प्रमाणात वाढवून दाखविले गेले आहे.ही कर्जे देताना दोन अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका अधिकाºयाला निलंबित करण्यात आले आहे.दुसरा अधिकारी मात्र यापूर्वीच निवृत्त झाला आहे. एकूण पाच शाखांत हा घोटाळा घडला असून, त्याचा तपास करण्याची विनंती सीबीआयला यापूर्वीच करण्यात आली आहे. बशीरबाग आणि गुंटूर येथील शाखांशी संबंधित प्रकरणांत सीबीआयने तपास सुरूही केला असून, गुन्हे दाखल केले गेले आहेत, असे आयडीबीआय बँकेच्या वतीने सांगण्यात आले.तत्पूर्वी, मंगळवारी बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेने गुणवत्ता आश्वासक लेखापरीक्षण सुरू केले आहे. हे परीक्षण एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. बँकेच्या कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे परीक्षण केले जात आहे. घोटाळ्याचे वृत्त येताच आयडीबीआय बँकेचे समभाग बुधवारी घसरले. मुंबई शेअर बाजार आणि राष्टÑीय शेअर बाजार अशा दोन्ही बाजारांत बँकेला फटका बसला. सकाळच्या सत्रात बँकेचे समभाग ३.५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. बँकेने पाचही प्रकरणांत सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :बँक