Join us

आणखी डाळींची आयात करण्याचा विचार

By admin | Published: November 25, 2015 11:21 PM

मागणी आणि पुरवठा यातील फरक पाहता डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळींची आणखी आयात करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

नवी दिल्ली : मागणी आणि पुरवठा यातील फरक पाहता डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळींची आणखी आयात करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.सध्या बाजारात डाळींचे भाव १८० रुपये प्रतिकिलो आहेत. आतापर्यंत एमएमटीसीने सरकारतर्फे ५ हजार टन तूर डाळीची आयात केली आहे. हा साठा दिल्लीसह काही राज्यांत सबसिडीच्या दरात देण्यात आला आहे. खुल्या बाजारात विक्री करण्याचा त्यामागचा उद्देश आहे.कमी पाऊस झाल्याने २०१४-१५ जुलै ते जून या पीक वर्षात डाळींचे उत्पादन २० लाख टनांनी घटले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी वित्त, खाद्य, ग्राहक, कृषी आणि वाणिज्य मंत्रालयांच्या सचिवांची बैठक झाली. त्यात अन्य आवश्यक वस्तूंची उपलब्धता आणि दर याबाबत विचारविनिमय झाला. या बैठकीतच समितीने डाळींची आयात करण्याचा निर्णय घेतला. आयात डाळींच्या प्रमाणावर निगराणी ठेवण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.दरम्यान, टमाटे आणि वाटाण्यांचे भावही गेल्या काही दिवसांत वाढले होते. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानला होणारी टमाटे आणि इतर भाजांची निर्यात घटली आहे. तथापि, आता टमाटे आणि वाटाण्यांचे भाव घटण्यास प्रारंभ झाला असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत आठवडाभरापूर्वी मटारचे भाव १३९ रुपये प्रतिकिलो होते. टमाट्याचे भावही ६० रुपये प्रतिकिलो झाले होते. सध्या मटारचे भाव ७९ रुपये प्रतिकिलो, तर टमाट्याचे भाव घटून ४८ रुपये ते ५० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. डिसेंबरच्या मध्यापर्यंत नवीन पीक बाजारात आल्यानंतर हे भाव आणखी घटतील.