नवी दिल्ली : आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC First Bank) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणली आहे. या ऑफरमध्ये बँक 48 दिवसांसाठी ग्राहकांना इंटरेस्ट फ्री कॅश अॅडव्हान्सची सुविधा देत आहे. आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसायाला चालना देण्यासाठी बँकेने ही सुविधा जाहीर केली आहे. बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर बिनव्याजी रोख रक्कम मिळण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, बँक सेव्हिंग अकाउंटवर (बचत खात्यावर) वार्षिक 7 टक्के दराने ग्राहकांना व्याज देत आहे. गेल्या शुक्रवारी बँकेने या दोन्ही सुविधांचा शुभारंभ केला.
बँकिंग क्षेत्रात प्रथमच बँकेकडून इंटरेस्ट फ्री कॅश अॅडव्हान्सची सुविधा दिली जात आहे. या फीचरची सध्या टेस्ट केली जात आहे. मात्र, लवकरच ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल, असे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. मधिवानन यांनी सांगितले. याशिवाय, बँक आता क्रेडिट कार्डच्या स्पेसमध्ये प्रवेश करत आहे. मार्चनंतर या सुविधेचा विस्तार केला जाईल, असे बी. मधिवानन यांनी सांगितले. तसेच, इतर बँकांकडून 36 ते 40 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. मात्र, आमच्याकडे प्रतिवर्ष 9 ते 36 टक्के शुल्क असते, असेही बी. मधिवानन म्हणाले. याचबरोबर, वार्षिक टक्केवारी दर ग्राहकांच्या क्रेडिट व्यवहारवर अवलंबून असतो, असे आयडीएफसी फर्स्ट बँकेने म्हटले आहे.
बँक लाँच करत आहे, क्रेडिट कार्ड!
सध्या क्रेडिट कार्डवर रोख अॅडव्हान्सवरील व्याजदर खूप जास्त आहेत. हे लक्षात घेता बँकेने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. या व्यतिरिक्त बँक केवळ वर्षाला 9 टक्क्यांपर्यंत व्याज असेलेले क्रेडिट कार्ड बाजारात आणणार आहे. या सुविधेचा लाभ त्या ग्राहकांना देण्यात येईल, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, असे बँकेने म्हटले आहे. याचा अर्थ असा की आपला क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे.
5 प्रकारचे असेल क्रेडिट कार्ड
बँक पाच प्रकारचे क्रेडिट कॉर्ड बाजारात आणणार आहे, ज्यामध्ये मासिक 0.75 पासून 2.99 टक्के म्हणजेच 9 टक्के ते 35.88 टक्क्यांपर्यंत वार्षिक राहील. FIRST मिलेनिया क्रेडिट कार्ड, FIRST क्लासिक क्रेडिट कार्ड, FIRST सिलेक्ट क्रेडिट कार्ड, FIRST वेल्थ क्रेडिट कार्ड आणि एम्प्लॉयी क्रेडिट कार्ड, असे या कार्डचे नाव असणार आहे.