What is Modi Stocks: ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशाची राजकीय कमान कोणाच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसं झाल्यास शेअर बाजारालाही (Share Market) नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात शेअर बाजारातील काही पीएसयू शेअर्स (PSU Stocks) रॉकेट बनण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी सीएलएसएनं अशा शेअर्सना 'मोदी स्टॉक्स' (Modi Stocks) असं नाव दिलं आहे. सध्याच्या सरकारच्या धोरणांचा ५४ कंपन्यांना थेट फायदा होऊ शकतो. या यादीमध्ये कॅपेक्स आणि पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांशी संबंधित अनेक सरकारी उपक्रमांचा (पीएसयू) समावेश आहे, ज्यांना ब्रोकरेजनं 'मोदी स्टॉक्स' असं नाव दिलं आहे.
आकर्षक व्हॅल्यूएशन, हाय डिविडेंड यील्ड, ऑर्डर बुकमध्ये झालेली वाढ आणि सरकारकडून मिळणारा विश्वास यामुळे सरकारी कंपन्यांचं मूल्य वाढले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकारी कंपन्यांचे शेअर्स रि-रेटेड करण्यात आले आहे.
गेल्या दोन निवडणुकांत बनलेत रॉकेट
या यादीत एल अँड टी, एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, ओएनजीसी, आयजीएल आणि महानगर गॅस यांचा समावेश आहे. ब्रोकरेजनं दिलेल्या माहितीनुसार पीएसयू शेअर्स जून किंवा जुलैपर्यंत वाढत राहतील आणि गेल्या दोन निवडणुकांमध्येही असाच पॅटर्न दिसून आला होता, जेव्हा निवडणूक निकालानंतर पीएसयू शेअर्समध्ये तेजी आली होती. 'मोदी स्टॉक्स'न निफ्टीला मागे टाकले असून सध्याचे सरकार पुन्हा भक्कम बहुमतानं सत्तेवर आल्यास हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.
आणखी कोणाचा मोदी स्टॉक्समध्ये समावेश
अशोक लेलँड, अल्ट्राटेक, एल अँड टी, बजाज फायनान्स, मॅक्स फायनान्शियल्स, झोमॅटो आणि डीमार्ट या कंपन्यांचे समभाग सीएलएसएनं हायलाइट केलेत. भारती एअरटेल, इंडस टॉवर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या सीएलएसएच्या टॉप रेटेड कंपन्या आहेत. या शेअर्सव्यतिरिक्त एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक या बँकांच्या शेअर्समध्येही तेजी दिसू शकते, असं सीएलएसएनं म्हटलं आहे.
(टीप : तज्ज्ञांच्या शिफारशी, सूचना, मतं आणि सल्ले हे त्यांचे वैयक्तिक आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)