मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीने भारतात येण्यास नकार दिला आहे. भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मॉब लिंचिंगसारखा प्रकारहोऊ शकतो. त्यामुळे मी भारतात येऊ शकत नाही, असे नीरव मोदीने ईडीसोबत ईमेलच्या माध्यमातून झालेल्या संवादामध्ये सांगितले.
ईडीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान नीरव मोदीने सुरक्षा कारणांचा हवाला देत सरेंडर करण्यास नकार दिला. ईडीशी साधलेल्या संवादात तो म्हणाला, '' मला मिळत असलेल्या धमक्या आणि सुरक्षेविषयीच्या कारणांमुळे मी भारतात येऊ शकत नाही. मी होळीच्या वेळी भारतीय लोकांकडून माझे पुतळे जाळण्यात येत असल्याचे पाहिले आहे. मला कर्मचारी, घर मालक, ग्राहक आणि अन्य एजन्सींकडून धमक्या देण्यात येत आहेत. एवढ्या धमक्या मिळत असल्याने मी भारतात येऊ शकत नाही.
नीरव मोदीचे वकील पी. अग्रवाल यांनी सांगितले की, ''शनिवारी पीएमएलए कोर्टात नीरव मोदीला फरार सिद्ध करण्यासाठी सुनावणी सुरू होती. मात्र आपण योग्य पासपोर्टच्या आधारे देश सोडला आहे आणि जेव्हा आपण देशाबाहेर गेलो तेव्हा आपल्यावर एनपीए नव्हता, असे नीरव मोदीकडून सांगण्यात आले.''
V Aggarwal,Nirav Modi's lawyer:He expressed security concerns in emails to CBI & pointed out burning of his effigies, & mob lynching episodes in India. He has been made a poster boy of bank frauds for no reason. He also quoted incident of suicide of Mr Bansal due to CBI's torture pic.twitter.com/DL8J7CRZCM
— ANI (@ANI) December 1, 2018
दरम्यान, नीरव मोदी यांनी सीबीआयला एक ईमेल पाठवला असून, त्यात भारतात आल्यास आपल्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. आपले पुतळे जाळण्यात आल्याचा तसेच मॉब लिंचिंगचाही उल्लेख केला आहे. आपल्याला विनाकारण बँक घोटाळ्यांचा पोस्टर बॉय बनवण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे." असेही नीरव मोदीच्या वकिलांनी पुढे सांगितले.