Join us  

इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल, तर...? पाहा आता काय करता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 2:50 PM

अजूनही तुम्ही आयकर रिटर्न भरलेले नाही? - ठीक आहे, त्यामुळे फार गांगरुन जाण्याची गरज नाही.

आपले इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही आयकर विभागाकडे दाखल केलेय ना? - त्याची अखेरची मुदत ३१ जुलै २०२२ होती. - काय म्हणता? अजूनही तुम्ही आयकर रिटर्न भरलेले नाही? - ठीक आहे, त्यामुळे फार गांगरुन जाण्याची गरज नाही, पण लक्षात ठेवा, एक जागरूक नागरिक म्हणून आयकर रिटर्न वेळेत भरणं ही आपली जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. त्यात कोणतीही हयगय करू नये.

- पण, मग आता काय करता येईल?

काही कारणानं तुमचं आयकर रिटर्न भरणं राहिलं असेल, तर ठराविक दंड भरून तुम्हाला तुमचे आयकर रिटर्न भरता येऊ शकेल. पण रिटर्न भरायला तुम्ही उशीर केल्यामुळे कदाचित आणखीही थोडा भुर्दंड तुम्हाला बसू शकेल.

दंडासहित आयकर रिटर्न भरण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. मात्र त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याची गरज नाही. शक्यतो जेवढ्या लवकर  शक्य होईल तितक्या लवकर रिटर्न भरणे कधीही चांगले. अन्यथा आपल्या खिशातून जाणाऱ्या रकमेत वाढ होऊ शकते.

ज्या पद्धतीनं आपण आपला नेहमीचा रिटर्न दाखल करतो, त्याच पद्धतीनं आताही तुम्हाला तुमचा रिटर्न दाखल करता येईल. फरक फक्त इतकाच की, ‘पार्ट ए’ मध्ये ‘जनरल इन्फर्मेशन’च्या ऐवजी कलम १३९(४) अंतर्गत ‘बिलेटेड रिटर्न’ हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. रिटर्न भरण्याच्या तपशीलात बाकी फारसा काही फरक नाही, पण उशिरा रिटर्न भरत असल्यामुळे तुमच्या खिशाला थोडी चाट मात्र नक्कीच बसेल.

१- तुमचा जेवढा कर बाकी आहे, त्यानुसार कलम २३४ ए अंतर्गत दरमहा एक टक्का व्याज  भरावे लागेल.

२- रिटर्न उशिरा भरत असल्यामुळे कलम २३४ एफ अंतर्गत आयकर विभाग तुमच्याकडून पाच हजार रुपये दंड आकारू शकतो.  तथापि, तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे. विलंबित रिटर्न भरण्यापूर्वी दंडाची ही रक्कम भरणे आवश्यक आहे.

३- तुम्ही जर कर परताव्यासाठी पात्र असाल तर, कर विभाग कलम २४४ ए अंतर्गत व्याज देते, ज्याचा काही भाग विवरणपत्र उशिरा दाखल केल्यामुळे तुम्हाला गमवावा लागेल.

टॅग्स :इन्कम टॅक्स