Join us

राजनच गव्हर्नर राहिले तर रुपया मजबूत होईल

By admin | Published: May 11, 2016 3:19 AM

रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची फेरनियुक्ती झाली नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणे बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची दररोज वेगाने घसरण होईल

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची फेरनियुक्ती झाली नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणे बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची दररोज वेगाने घसरण होईल, असा लक्षवेधी अहवाल ‘सीएलएसए’ या वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक फर्मने नुकताच जारी केला.रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाल सप्टेंबर २0१६ अखेर संपत असून, नियमानुसार ते फेरनियुक्तीस पात्र आहेत. ‘सीएलएसए’च्या या अहवालानंतर भारतीय रुपयाचे भवितव्य आणि रघुराम राजन यांची गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती या विषयाबाबत बॉण्ड मार्केटमध्येही चिंतेचे वातावरण आहे. रघुराम राजन यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी सप्टेंबर २0१३मध्ये नियुक्ती झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चलनाची स्थिती त्या वेळी चिंताजनक होती. एक अमेरिकन डॉलरला ६८.८५ रुपये अशा पातळीपर्यंत भारतीय चलन घसरले होते. राजन यांनी गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या काही महिन्यांत भारतीय रुपयाने पुन्हा उसळी मारली. नोव्हेंबर २0१३पर्यंत प्रति डॉलर ६१ ते ६२ रुपयांवर विनिमय दर स्थिरावला.आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया मजबूत झाल्यामुळे या कालखंडात भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. राजन यांच्या पहिल्या कार्यकालात भारतीय रुपयाने थोडेफार चढउतार जरूर अनुभवले; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात रुपया बऱ्यापैकी यशस्वी ठरला, हे वास्तव मान्यच करावे लागेल.