नवी दिल्ली – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा भारतावर आरोप केला आहे. हत्येच्या ३ महिन्यांनी ट्रूडो यांची झोप उडाली. भरसंसेदत त्यांनी निज्जरच्या हत्येबद्दल भारतीय संस्थांना जबाबदार धरले. त्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले. कॅनडाच्या प्रत्येक आरोपावर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारत आणि कॅनडा यांच्यात ८ बिलियन डॉलरहून अधिक व्यवसाय होतो. त्यामुळे जर हे संबंध आणखी ताणले तर कोणत्या देशाला जास्त नुकसान होईल याचे उत्तर थेट देणं कठीण होईल.
कॅनडात किती आहे भारतीय विद्यार्थी?
२०२२ च्या आकडेवारीनुसार, १.८० लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडात राहून शिक्षण घेत आहेत. अमेरिकेनंतर भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी पसंती कॅनडा आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एकूण १३.८४ टक्के विद्यार्थी कॅनडात जातात.
भारत-कॅनडा यांच्या संबंधात पर्यटनाचे किती योगदान?
भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये कॅनडा पाचव्या नंबरवर आहे. २०२२ मध्ये कॅनडाहून २.८ लाख पर्यटक भारतात आले. याउलट भारतीयांसाठी कॅनडा ट्रीप नवव्या नंबरवर आहे. मागील वर्षी ८ लाख भारतीय कॅनडाला गेले होते.
कॅनडात किती भारतीय? किती डॉलर पाठवतात?
कॅनडात १७.६ लाख निवासी भारतीय आहेत. भारतीय लोकसंख्येच्या तुलनेने जगात कॅनडा सातव्या नंबरवर येते. त्यात १५.१ लाख लोकांनी कॅनडा अथवा इतर देशाचे नागरिकत्व घेतले आहे. १.८ लाख निवासी भारतीय आहे. ज्यांनी २०२१ मध्ये भारतात त्यांच्या कुटुंबाला जवळपास ४ बिलियन डॉलर पाठवले आहेत. रेमिटेंस प्रकरणी कॅनडा नवव्या नंबरवर आहे.
भारत-कॅनडात आयात-निर्यात किती?
भारत आणि कॅनडा यांच्यात २०२२-२३ काळात फक्त ८.२ बिलियन डॉलर व्यवसाय झाला. भारताच्या व्यापार यादीत कॅनडा ३५ व्या नंबरवर आहे. मागील वर्षी कॅनडाने भारताला ५ मिलियन टन मसूर डाळ विकली. त्याशिवाय स्टील बनवण्यासाठी लागणारे कोकिंग कोल १ बिलियन डॉलर भारताने खरेदी केले. कॅनडातून भारताला फर्टिलायझर इंडस्ट्रीसाठी पोटेशियम क्लोराईड, पेपर आणि न्यूजप्रिंटसाठी लागणारे लाकडी लगदा मिळतो. बदल्यात कॅनडाने भारताकडून १०० मिलियन डॉलर मूल्याचे स्मार्टफोन्स खरेदी केले. त्याचसोबत २०० मिलियन डॉलर औषधे खरेदी केलेत.