ज्यांचे लग्न होणार आहे, ते लग्नानंतर नवा संसार थाटणार असून, या जोडप्याकडे स्वतःची फार बचत नाही. जी होती, त्यातला बराच पैसा भाड्याने घर घेण्यात संपला आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला या जोडप्याला मदत करायची असेल, त्यांनी लग्नात फुले किंवा अन्य भेटवस्तू देण्याऐवजी घरगुती वापराच्या वस्तू दिल्यास आम्ही आभारी राहू! यासोबत एक यादी जोडली आहे, त्यातली जी वस्तू तुम्हाला परवडत असेल ती तुम्ही देऊ शकाल!- मात्र तसे आम्हाला आधी कळवल्यास आम्ही आभारी राहू...
असे विनंतीपत्र लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेबरोबर आले तर ? - भारतात आपल्याला काहीसे आश्चर्य वाटेल; पण बहुतांश आफ्रिकी देशांमध्ये ही पद्धत त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. या पद्धतीला स्वाहिलीमध्ये ‘हॅरॅम्बी’ असे म्हणतात . या शब्दाचा अर्थ लेटस् पूल टुगेदर! म्हणजे चला, सगळ्यांनी एकत्र येऊन आपापला हातभार लावू!
- या ‘हॅरॅम्बी’चा वापर केवळ लग्नप्रसंगीच नव्हे, तर घर बांधणे, आजारपण, उच्च शिक्षण अशा अनेक प्रसंगी कुणाला न परवडणारे खर्च अचानक उत्पन्न झाल्यास केला जातो. पूर्वीच्या काळी आफ्रिकन देशांमध्ये यासाठी आपल्याकडे पिटतात तशी दवंडी देण्याचीच प्रथा होती म्हणे. अशा रीतीने कुणाच्या अडीअडचणीला अख्खे गाव एकत्र येऊन उभे राहत असे. हल्ली नव्या स्टार्टअप कंपन्या क्राउड फंडिंग उभारतात, तो या प्राचीन ‘हॅरॅम्बी’चाच नवा आधुनिक अवतार तर आहे!
आधुनिक बँकिंग आणि अन्य अर्थविषयक व्यवस्था उभ्या राहण्याच्या कितीतरी आधी परस्परांना मदत करण्याच्या अशा व्यवस्था जगभर प्रचलित होत्याच. आफ्रिकेमध्ये तर ‘आपल्यावर आर्थिक संकट आले असून मला मदत करा’ असे उघडपणे सांगण्याला बराच प्रदीर्घ इतिहास आहे. कर्जाचा भार पेलवेनासा झाला, तर देणेकरी घेणेकऱ्याला विनम्र आवाहन करून तो भार कमी करण्याची जाहीर विनंतीही करू शकत असे.
कालौघात हे चित्र बदलले असले, तरी आर्थिक व्यवहारात अडचणीत आलेल्याच्या मागे अवघ्या गावाने उभे राहून त्याला आधार देण्याच्या या प्राचीन परंपरा एका वेगळ्याच संस्कृतीची गोष्ट सांगतात, हे मात्र नक्की!