Join us  

कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:37 AM

या कारणावरून दोन वर्षात ४७ टक्के तरुण नोकरी सोडणार असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.

नवी दिल्ली : मन नोकरीत लागेनासे झाल्यास तसेच कामातून समाधान मिळत नसल्यास जेन-झेड नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. या कारणावरून दोन वर्षात ४७ टक्के तरुण नोकरी सोडणार असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.

‘जेन-झी ॲट वर्कप्लेस’ नामक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ५,३५०पेक्षा अधिक युवक आणि ५०० एचआर प्रोफेशनल्सची मते त्यात जाणून घेण्यात आली आहेत. वर्ष १९९५ ते २०१० या काळात जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन झेड’ असे म्हटले जाते. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तसेच नोकरी करणाऱ्या जेन - झी तरुणांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले.

सर्वेक्षण अहवालानुसार, जेन-झेड युवक करिअर क्षेत्र अथवा कंपनीची निवड करताना कार्य आणि जीवन यांच्या समन्वयास अधिक महत्त्व देतात. असे असले तरी करिअरच्या बाबतीत ही पिढी आपल्या प्राधान्यांना महत्त्व देते. पाहणी सहभागी झालेल्या ४०% तरुणांनी पसंतीच्या क्षेत्रात काम मिळेल का याची चिंता वाटते असे सांगितले तर २५% तरुणांनी नोकरी बदलताना केवळ वेतनाला महत्त्व दिले.

काय सांगतो अहवाल?

७८% तरुणांनी नोकरी करताना करिअर वृद्धीला महत्त्व दिले.

७७% जणांना वेतनापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे वाटले.

७७% युवकांनी ब्रॅण्डला महत्त्व दिले.

७१% जणांनी उत्तम वेतनासाठी नोकरी बदलण्याची तयारी दर्शविली.

५१% तरुणांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटत आहे.

४३% युवकांनी अनुभव वृद्धीला महत्त्व दिले.

टॅग्स :नोकरी