आपण अनेकदा बाहेर फिरायला जातो, परदेशवारीही करतो, त्याचे फोटो आपण सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही तसंच करत असतात. फॅशन, लाईफस्टाईल आणि फिटनेस अशा क्षेत्रातील काही इन्फ्लुएन्सर्सनं सोशल मीडियावर असेच काही परदेशवारीचे फोटो शेअर केले होते. परंतु आता त्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीसचा सामना करावा लागतोय. आयकर विभागानं अशा १५ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना नोटिसा पाठवल्या आहेत ज्यांनी त्यांच्या परदेशवारीचे आणि लक्झरी शॉपिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
यासोबतच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीसाठी जाहिरात पोस्ट करून मोबदल्यात पैसे घेऊनही शून्य किंवा खूप कमी कर भरणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवरही विभाग लक्ष ठेवून आहे. या यादीमध्ये एक हाय-प्रोफाइल फॅशन इन्फ्लुएन्सर, एक लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर आणि फिटनेस कोच, ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूडबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करणारे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स यांचा देखील समावेश आहे.
इन्कम टॅक्स रिटर्नही नाही
इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, यापैकी तिघांनी इन्कम टॅक्स रिटर्स भरलं नाही, तर उर्वरित लोकांनी त्यांचं उत्पन्न खूपच कमी असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, त्यांनी त्यांची नावे उघड केली नाहीत. YouTube, Instagram, Twitter आणि सोशल मीडिया ब्लॉगिंग साइटवर कंन्टेंट पोस्ट करणारे अनेक इन्फ्लुएन्सर्स विभागाच्या रडारवर आहेत. दरम्यान, एका उदाहरणाचा दाखला देत या अधिकाऱ्यानं दिला. मुंबईतील एका आघाडीच्या फॅशन आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सरला लक्झरी मेकअप ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी इंस्टाग्रामवर एका पोस्टचे ५०००० ते १ लाख रुपये मिळत होते. एकाच कंपनीतून वेगवेगळ्या पोस्टसाठी ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई असूनही, या इन्फ्लुएन्सरनं केवळ ३.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न दाखवल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.
अभिनेत्याचाही समावेश
गेल्या आठवड्यात, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केरळमध्ये एका प्रादेशिक अभिनेत्यासह १० युट्युबर्सवर छापे टाकले. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग रिपोर्टनुसार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केट २०२१ मध्ये ९०० कोटी रुपयांचं होतं, जे २०२५ मध्ये २,२०० कोटी होईल असा अंदाज आहे. भारतातील १०००० ते ५०००० फॉलोअर्स असलेल्या मायक्रो इन्फ्लुअर्सना प्रायोजित कन्टेंटवर प्रति पोस्ट ५ हजार ते ३० हजार रुपये मिळतात, तर ५ लाख फॉलोअर्स असलेल्यांना प्रत्येक पोस्टचे १५ हजार ते ४० हजार रुपये मिळतात. ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येक पोस्टचे ५० हजार ते १.५ लाख रुपये मिळतात.
एका आर्थिक वर्षात २० लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या सोशल मीडिया पर्सनॅलिटीजनी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत त्यांच्या सेवांची नोंदणी करावी. जीएसटी अंतर्गत, या सेवांवर १८ टक्के कर आकारला जातो. १ जुलै २०२२ पासून, आयकर विभागाच्या कलम १९४ आर नुसार, जाहिरातीसाठी ब्रँडकडून प्राप्त झालेल्या २० हजार रुपयांपर्यंतच्या शुल्कावर १० टक्के टीडीएस कापला जातो. टीडीएसच्या तरतुदीमुळे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचं उत्पन्न निश्चित करण्यात खूप मदत झाली असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.