Join us

तुम्हीही पीएम किसान योजनेचा नियमबाह्य लाभ घेत असाल तर होऊ शकतो तुरुंगवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:25 PM

अपात्र शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना एक वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा () लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दरम्यान, या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत असे अनेक शेतकरी सामील झाले आहेत, जे या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करत नाहीत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. 

सरकार आता या अपात्र शेतकऱ्यांकडून पूर्ण पैसे वसूल करत आहे. तसेच, त्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेण्याऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम देशातील राज्य सरकारांकडून सुरू आहे. तुमच्या घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे हप्ता घेत असतील तर तुम्हाला 2000 रुपये हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. म्हणजेच, एखाद्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि मुलगा यांना एकाच जमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत असेल तर त्यांना ते पैसे सरकारला परत करावे लागतील. 

नियमानुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कुटुंबातील फक्त एका सदस्याला हप्ता मिळू शकतो. अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत असले तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकरणात त्याला तुरुंगातही जावे लागू शकते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वर्षांपूर्वी छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली करोडो रुपयांची फसवणूक झाली होती. यामध्ये सुमारे 17 हजार अपात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून सुमारे 25 कोटींची फसवणूक केली होती. आता ही बनावट 43 कोटी झाली आहे. 53 हजार शेतकऱ्यांनी बनावट पद्धतीने नोंदणी करून ही रक्कम मिळवली आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे घेणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना कृषी उपसंचालक कार्यालयात रोखीने पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा केल्यावर त्यांना पावती मिळेल. पैसे दिल्यानंतर शेतकऱ्यांचा डेटाही पोर्टलवरून काढून टाकला जाईल. दुसरीकडे, 13वा हप्ता जाहीर झाल्यापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. भारत सरकार लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी