Join us

फेक फोन कॉलनं कंटाळला असाल तर, सरकारचं हे पाऊल तुम्हाला देणार दिलासा; पाहा नक्की आहे काय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:29 AM

सध्या बहुतांश मोबाईल यूजर्स फेक कॉल्समुळे हैराण झाले आहेत. पण आता यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या बहुतांश मोबाईल यूजर्स फेक कॉल्समुळे हैराण झाले आहेत. मार्केटिंगपासून प्रोडक्ट्सच्या विक्रीपर्यंतचे फेक कॉल्स दिवसभर त्रास देत असतात. आता दूरसंचार नियामक ट्रायनं यावर पावलं उचलली आहेत. TRAI नं फोन स्क्रीनवर कॉलरचं नाव दाखवण्यासाठी टेलिकॉम नेटवर्कमध्ये सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं (TRAI) आपल्या शिफारशीत म्हटलंय की, 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' (CNAP) सेवेअंतर्गत मोबाइल फोन स्क्रीनवर कॉलरचं नाव प्रदर्शित करण्याची प्रणाली सुरू करावी. मात्र, सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या विनंतीनुसारच ही सुविधा देतील. असं केल्यानं तुम्हाला कॉल रिसिव्ह करण्यापूर्वी कोण कॉल करत आहे हे कळेल. हे तुम्हाला बनावट कॉलपासून दिलासाही मिळेल. 

नको असलेल्या कॉलपासून सुटका 

या फीचरमुळे वारंवार येणाऱ्या अनवाँटेड कॉल्सपासून सुटका मिळण्यास खूप मदत होईल. CNAP फीचर सक्रिय झाल्यावर, ग्राहक त्याच्या फोन स्क्रीनवर कॉलरचं नाव पाहू शकतील. एका विशिष्ट तारखेनंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व फोनमध्ये CNAP फीचर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना योग्य निर्देश द्यावेत, असं ट्रायनं म्हटलंय. मोबाईल फोन कनेक्शन घेताना ग्राहकांच्या फॉर्ममध्ये (CAF) दिलेलं नाव आणि ओळखीच्या माहितीचा वापर CNAP सेवेदरम्यान केला जाऊ शकतो.  

Truecaller, Bharat Caller च्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह 

दरम्यान, Truecaller आणि Bharat Caller सारखी ॲप्स देखील कॉलरचं नाव ओळखणं आणि स्पॅम शोधण्याची फीचर्स ग्राहकांना देतात. परंतु या सेवा लोकांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित असतात जे नेहमी विश्वसनीय नसतं. दूरसंचार नियामकाने शिफारस केली आहे की सर्व अॅक्सेस सेवा प्रदात्यांनी त्यांच्या टेलिफोन ग्राहकांना विनंतीनुसार CNAP सेवा पुरवावी. ट्रायनं नोव्हेंबर २०२२ मध्ये या संदर्भात सल्ला पत्र जारी केलं होतं, ज्यामध्ये भागधारक, सार्वजनिक आणि उद्योगांकडून टिप्पण्या मागितल्या होत्या. 

टॅग्स :सरकारट्राय