Join us  

प्रोडक्ट आवडलं नाही? १० मिनिटांत रिटर्न किंवा एक्सचेंज होणार; या कंपनीने आणली नवीन ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:13 AM

Return Exchange Policy : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता उत्पादन आवडलं नाही तर १० मिनिटांत रिटर्न करता येऊ शकते.

Return Exchange Policy : गेल्या काही वर्षात क्विक कॉमर्स कंपन्या झपाट्याने हातपाय पसरत आहेत. लोक आता ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहे. तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून एखादी वस्तू ऑर्डर केली आणि ती आवडत नसेल, तर तुम्ही ती १० मिनिटांच्या आत परत करू शकता किंवा बदलू शकता. सध्या एखादं उत्पादन आवडत नसल्यास किंवा उत्पादनात दोष असल्यास ते परत करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी किमान ७ दिवस प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आता हा त्रास केवळ १० मिनिटांत मिटणार आहे. गेल्या आठवड्यात ब्लिंकिटने देशातील निवडक शहरांमध्ये १० मिनिटांच्या आत कपडे आणि शूजसाठी रिटर्न आणि एक्सचेंज सुविधा सुरू केली आहे.

कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढू शकतो तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की १० मिनिटांत वस्तू परत करण्याचा किंवा देवाणघेवाण करण्याचा उपक्रम सुरू केल्यास ई-कॉमर्स कंपन्यांवरील आर्थिक भार वाढू शकतो. रिव्हर्स लॉजिस्टिकसाठी लागणारा मोठा खर्च ई-कॉमर्स कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत, १० मिनिटांत रिटर्न पॉलिसी आणल्याने हे ओझे आणखी वाढू शकते. फॅशन आणि ॲक्सेसरीजमध्ये सुमारे २०% ते ३०% रिटर्न ऑर्डर असतात. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ३% ते १५% रिटर्न पाहायला मिळतात.

लॉजिस्टिक आणि स्टोरेज खर्च वाढणार १० मिनिटांत रिटर्न पॉलिसीने ई-कॉमर्स कंपन्यांचा लॉजिस्टिक खर्च वाढणार आहे. या सोबत स्टोरेजची समस्याही उद्भवू शकते. सध्या १ तास ते काही दिवसांत रिटर्न पॉलिसी चालू ठेवणे चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वारंवार रिटर्न आल्यास मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा लवचिक रिटर्न विंडो ऑफर करणे किंवा विशिष्ट श्रेणींसाठी रिटर्न फी आकारणे यासारख्या कल्पनांमुळे खर्च संतुलित करण्यात मदत होऊ शकते. चांगल्या पॉलिसी क्विक कॉमर्स कंपन्यांमधील काम सुलभ होण्यास मदत होईल. Myntra सारखे प्लॅटफॉर्म सध्या जास्त रिटर्न देणाऱ्या ग्राहकांकडून प्रति ऑर्डर १९९-२९९ रुपये आकारतात. एखाद्या ग्राहकाने फ्री रिटर्न मर्यादा पार केल्यांतर त्यांना प्रति रिटर्न १५-३० रुपये आकारले जातात.

टॅग्स :खरेदीझोमॅटो