मुंबई : एटीएममधून पैसे काढताना अनेकदा फाटक्या नोटा येतात. पण, अशी एखादी फाटकी नोट तुम्हाला एटीएममधून मिळाली असेल, तर गांगरून जाऊ नका. अगदी सहज-सोप्या प्रक्रियेद्वारे फाटलेली नोट तुम्हाला बदलून मिळू शकते. विशेष म्हणजे फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देण्याचा अधिकारच बँकांना नाही.
फाटकी नोट बदलून घेण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल. अर्जात पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करा. पैसे काढल्याची रिसीटही सोबत जोडा. रिसीट मिळाली नसेल तर मोबाईलवर आलेल्या मेसेजची प्रिंटही देता येऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार कोणतीही बँक फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने ट्विटरवर अशीच तक्रार केली होती. त्या ट्विटला एसबीआयकडून उत्तर देण्यात आले होते. एसबीआयने म्हटले होते, आम्ही एटीएममध्ये पैसे लोड करण्यापूर्वी प्रत्येक नोटेची अत्याधुनिक सॉर्टिंग मशीनद्वारे तपासणी करतो. त्यामुळे आमच्या एटीएममधून खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा येणे अशक्य आहे. तरीही तुम्ही एसबीआयच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधून नोट बदलून घेऊ शकता.
एसबीआयमध्ये अशी करा तक्रार
एसबीआयच्या एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल, तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या लिंकवर क्लिक करून तक्रार नोंदवू शकता. फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत. तसे घडल्यास बँकांवर कायदेशीर खटला भरला जाऊ शकतो. नोटा बदलून देण्याचे नाकारणाऱ्या बँकांना ग्राहकास १० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागू शकते.