मी दिल्ली येथील एका कंपनीच्या बीडमधल्या कार्यालयाद्वारे गुंतवणूक केलेली आहे. त्यात एका प्लॅननुसार दरमहा रु. दोनशे आणि दुसऱ्या प्लॅनच्या अंतर्गत रुपये पाच हजार गुंतवलेले आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्याची मुदत संपलेली आहे. पण मला माझे पैसे परत मिळालेले नाहीत. मी काय करू शकतो? - एक वाचक
तुम्ही दिल्लीच्या कंपनीमध्ये दोन प्लॅन्समध्ये पैसे गुंतवलेले आहेत. एक दरमहा गुंतवणुकीची योजना, दुसरी बहुधा फिक्स डिपॉजिट असावी! तुम्ही गुंतवणूक केलेली कंपनी ही खासगी व्यावसायिक संस्था आहे. त्याच नावाच्या तीन-चार कंपन्या दिल्लीमधल्या त्या पत्त्यावर नोंदविलेल्या दिसत आहेत. बाजारात अशाप्रकारचे नाम साधर्म्य असणाऱ्या अनेक बोगस कंपन्या असतात. या कंपनीने ठेवींसाठी सेबीसारख्या नियामक संस्थेची परवानगी घेतली आहे का, या संबंधातले दावे कोणत्या न्यायकक्षेत दाखल करावे लागणार आहेत, यासारख्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या पावतीच्या आधाराने तपासून पहाव्या लागतील. त्यावर तुमच्या बाबतीत पुढे काय करता येण्यासारखे आहे ते ठरवावे लागेल.
तुम्ही त्या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे, म्हणजे तुमचे त्या कंपनीशी ग्राहक-विक्रेता या प्रकारचे संबंध नाहीत. तशातच तुमच्या ठेवींची मुदत संपून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अनेकदा अशा रकमा अनामत.. बिनव्याजी कर्ज, उधारीने किंवा परतबोलीने दिलेली रक्कम आहे अशा प्रकारच्या नोंदी असलेल्या पावत्या दिल्या जातात. त्यामुळे या प्रकरणात तुम्हाला ग्राहक कायद्याचा कितपत आधार घेता येईल, याबद्दल शंका आहे. तुम्ही या संबंधात फौजदारी तक्रार पोलिसांकडे करू शकाल. खरा गुन्हेगार सापडला तर पुढची कारवाई होऊ शकेल. अशा पद्धतीने पैसे गोळा करणारी माणसे आपली, आपल्या कंपन्यांची नावे, पत्ते सतत बदलत असतात. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपल्या गावातल्या निष्णात फौजदारी वकिलांचा आपण याबद्दल सल्ला घेणे आवश्यक आहे.
खरेतर ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा, अशा अनेक बँका, म्युच्युअल फंड्ससारखे चांगले पर्याय उपलब्ध असताना कोणतीही विश्वासार्ह माहिती नसलेल्या संस्थेत गुंतवणूक करणे टाळणेच योग्य ठरले असते.
दिलीप फडके ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com