लोकमत न्यूज नेटवर्क : ‘तुम्ही यापूर्वी असे काहीही पाहिले नसेल’, असे म्हणत आघीडीची टेक्नॉलॉजी कंपनी ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी सोमवारपासून क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात सुरू झालेल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स २०२३ मध्ये ‘ॲपल व्हिजन प्रो’ नावाच्या ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेटची घोषणा केली. कूक यांनी ट्विटरवर व्हिजन प्रोचा व्हिडीओ टाकला आहे. यामध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी आणि मिक्स्ड रिॲलिटीचा वापर करण्यात आला आहे. कूक यांनी ही नवी सुरुवात असल्याचे म्हटले.
कधी येणार?
जवळपास दशकभरानंतर कंपनीने हे पहिले मोठे हार्डवेअर आणले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्रीला सुरुवात होईल.
किती काळ चालेल?
पूर्ण चार्ज केल्यावर २ तास चालू शकेल.
किंमत किती?
$३,४९९ सुमारे २.८० लाख रुपये ठेवली आहे. भारतात येईपर्यंत याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
- हे व्हीआर हेडसेटच्या तुलनेत स्कीइंग गॉगल्ससारखे दिसतात.
- यूजर्सना डोळ्यासमोर डिस्प्लेमध्ये सर्व स्मार्ट फीचर्स मिळतील.
- स्वतःसाठी कोणत्याही आकाराचा डिस्प्ले तयार करू शकतो.
- याच्या माध्यमातून तुम्ही व्हर्च्युअल स्क्रीन पाहू शकता, पण याचा अर्थ तुम्ही त्याच आभासी जगात राहता असे नाही. तुम्हाला हवे असल्यास वास्तविक जगातील आजूबाजूच्या व्यक्तींनाही तुम्ही आरामात पाहू शकता.
- आभासी जगात चित्रपट पाहू शकतात, ॲप्स वापरू शकतात किंवा लिखाणाचेही काम करू शकता.
- या हेडसेटद्वारे लोकांना डिजिटल कंटेंट पाहण्याचा, ऐकण्याचा आणि संवाद साधण्याचा त्यांच्या वास्तविक जगाचा भाग असल्याप्रमाणेच अनुभव मिळतो.
- हे उपकरण हात, डोळे आणि आवाजाद्वारे नियंत्रित केले जाते.