आपल्या कोणत्या कामासाठी अचानक पैशांची गरज भासू शकेल हे सांगता येत नाही. अनेकदा काही महत्त्वाचं काम असतं आणि त्यावेळी आपल्याकडे त्यासाठी तात्काळ पैसे उपलब्ध नसतात. पण त्यासाठी एका पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये रक्कम गुंतवली असेल, तर तुमच्यासाठी हा एक अतिशय फायदेशीर सौदा ठरू शकतो.
हे पैसे बँकेत जमा असतील तर त्यावर व्याज मिळणारच आहे. त्याच वेळी, आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही एफडी न मोडताही कर्ज घेऊ शकता. कठीण काळात ही एफडी खूप उपयोगी पडते. बँका एफडीमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी ९० टक्के ते ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. याशिवाय एफडीवर ओव्हरड्राफ्ट मर्यादेचा लाभही मिळतो. बँका तुम्हाला जमा रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मर्यादेचा लाभ देऊ शकतात.
तुम्ही एफडीवर कर्ज घेतल्यास, या कर्जावरील व्याजाचा दर वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच कमी असतो. यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या रकमेवरच तुम्हाला व्याज आकारले जाईल.
प्रोसेसिंग फी नाही
एफडीवर घेतलेल्या कर्जावर एफडीच्या दरापेक्षा २ टक्के जास्त व्याज आकारलं जातं. मात्र यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारलं जात नाही. तसंच कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरच व्याज लागू होतं. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल, तर ते कर्ज तुमच्या एफडीच्या रकमेतून कव्हर केलं जातं. एवढंच नाही तर एफडीवर अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. तुम्ही ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एफडी केल्यास, तुम्हाला इन्कम टॅक्स कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. दुसरीकडे, जर एफडी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीची असेल तर कर भरावा लागेल.
कोण घेऊ शकतं कर्ज?
यासाठी सॅलरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही प्रकारचं बचत खातं असणं आवश्यक आहे. एफडी एका व्यक्तीची असो किंवा संयुक्त, कोणताही एफडीधारक कर्ज घेऊ शकतो. ज्याचा क्रेडिट स्कोर चांगला आहे, त्यांना कर्जही मिळू शकते. परंतु ही अनिवार्य अट नाही. तसंच कोणत्या मायनरच्या नावावर एफडी असेल तर त्याला याचा फायदा मिळणार नाही. तसंच एफडी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असेल तरीही कर्ज मिळणार नाही.
कधी तोडावी एफडी?
जर तुम्हाला एफडी करून काही महिने झाले असतील तर तुम्ही कर्जाऐवजी एफडी तोडू शकता. जेव्हा तुम्हाला खूप पैशांची गरज असते तेव्हा हे देखील करा. तुम्हाला एफडीच्या फक्त २०-३० टक्के रक्कम हवी असेल तर एफडी तोडण्याऐवजी कर्ज घ्या. जेव्हा तुम्हाला किमान ७० टक्के रकमेची गरज असेल आणि ती सुरू करून काहीच महिने झाले असतील, तेव्हाच एफडी तोडण्याचा विचार करा.