महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.९० टक्क्यांची वाढ केलेली असताना केंद्र सरकारने अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग ९ तिमाहीत जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. मात्र निराश होऊ नका. गुंतवणुकीसह अधिक परताव्याचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
कोणता फंड सर्वात भारी?
रिझर्व्ह बँकेने व्याजदर १ टक्का वाढविले असताना बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदर ०.२% वाढविले आहेत. त्याचवेळी १० वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्यात वाढवून बाँड यिल्ड ७.३७%वर पोहोचले आहे. त्यामुळे डेट म्युच्युअल फंडांचा परतावा अधिक आकर्षक झाला आहे.
रोख्यांचा परतावा एफडीपेक्षा २% अधिक
रेपो दर वाढल्यानंतरही बँका एफडीचे व्याजदर वाढविण्याबाबत उत्साहित नसल्यामुळे १० वर्षांच्या एफडीवरील कमाल व्याज दर अजूनही ६.५%च आहे. याउलट बाँड यिल्ड ७.४ टक्के मिळत आहे. याचाच अर्थ रोख्यांवर २ टक्के अधिक व्याज मिळत आहे.
कुठे करू शकता गुंतवणूक?
इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्ट महेंद्र जाजू यांनी सांगितले की, अल्प बचत योजनांचे व्याजदर न वाढविल्यास गुंतवणुकीचा प्रवाह इतर पर्यायांकडे वळेल. सध्या डेट म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा अधिक चांगला पर्याय आहे.