नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना बसला. मात्र, त्यातून हळूहळू जग सावरताना दिसत आहे. भारताचीअर्थव्यवस्थाही सावरताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी (GST) संकलन नवे उच्चांक गाठत आहे. यातच आता सन २०३० पर्यंत भारत आशिया खंडातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था (Indian Economy) बनेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात वेगाने वाढणारा मध्यमवर्ग भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जमेची बाजू असून, मध्यमवर्ग जो ग्राहक म्हणून सेवा व उत्पादनांवर खर्च करताना अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांना चालना देत असतो. परिणामी देशाचा वस्तू व सेवा उपभोगावरील खर्च २०२० मध्ये १.५ लाख कोटी डॉलरवरून २०३० पर्यंत ३ लाख कोटी डॉलपर्यंत विस्तारण्याचा कयास बांधण्यात आला आहे.
जपानला मागे टाकून भारत आशियातील दुसरी अर्थव्यवस्था
आगामी दशकभरात म्हणजे २०३० सालापर्यंत जपानला मागे टाकून भारत ही आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. तसेच सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आघाडीवर (जीडीपी) देखील जर्मनी आणि इंग्लंडला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश तो बनू शकेल, असे आशादायी अनुमान आयएचएस मार्किटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केले आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि इंग्लंडनंतर भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
भारताचा जीडीपी २०२१ मधील २.७ लाख कोटी डॉलरवरून २०३० पर्यंत ८.४ लाख कोटी डॉलपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. देशात सध्या जलद गतीने सुरू असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताचा जीडीपी २०३० पर्यंत जपानपेक्षा अधिक होत, आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज आयएचएस मार्किटने व्यक्त केला आहे. एकूणच पुढील दशकात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची अपेक्षा आहे, असेही त्यात म्हटले आहे.
दरम्यान, संपूर्ण आर्थिक वर्ष म्हणजेच २०२१-२२ साठी (एप्रिल २०२१ ते मार्च २०२२), भारताचा वास्तविक जीडीपीचा दर ८.२ टक्के राहण्याची शक्यता आहे, जो २०२०-२१ या आर्थिक वर्षांत उणे ७.३ टक्क्यांपर्यंत आक्रसला होता. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ६.७ टक्के वेगाने वाढेल असा आयएचएस मार्किटने त्यांच्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे.