Join us  

अदानींची रोजची कमाई 1600 कोटी, अंबानींपेक्षा किती श्रीमंत आहेत अदानी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 1:43 PM

'IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट' अहवालातून माहिती समोर...

भारतात 2022 मध्ये एक हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या प्रथमच 1 हजार 100 वर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत या संख्येत 62 टक्क्यांची तर 2022 मध्ये ही संख्या 96 ने वाढली, अशी माहिती बुधवारी प्रसिद्ध झालेल्या 'IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट' अहवालातून पुढे आली.

बुधवारी जाहीर झालेल्या IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या एका वर्षात दररोज 1,600 कोटी रुपयांनी वाढून 10.94 लाख कोटी झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स वाढल्याने आशियातील सर्वात श्रीमंत असणारे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात अदानींच्या मालमत्तेत 116 टक्क्यांनी म्हणजे 5.88 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अंबानीपेक्षा अदानी किती श्रीमंत?रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती 3 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. अहवालातील माहितीनुसार, 2012 मध्ये अदानी यांची संपत्ती अंबानींच्या संपत्तीच्या जेमतेम एक षष्ठांश होती. 10 वर्षे सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून मुकेश अंबानी ओळखले जायचे. आता अंबानी  हे 7.94 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह यावर्षीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. गेल्या वर्षी अंबानींच्या संपत्तीत 11 टक्क्यांनी वाढ झाली होती.

कैवल्य व्होरा अब्जाधीशांच्या यादीत-

कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. ऑनलाइन शिकवणी चालवणारी कंपनी 'फिजिक्सवाला' चे सहसंस्थापक अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी तसेच ई-कॉमर्स क्षेत्रातील झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य व्होरा यांचा अब्जाधीशांच्या यादीत नव्याने समावेश झालाय. झेप्टोच्या मूल्यांकनात 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे 19 वर्षीय कैवल्य व्होरायांच्या वैयक्तिक संपत्तीत मोठी वाढ झाली असून ती 1000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

टॅग्स :पुणेअदानीमुकेश अंबानीभारत