नवी दिल्ली : IIFL वेल्थ आणि हारुन इंडियाने देशातील 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सेल्फमेड म्हणजेच स्वत:च्या ताकदीवर व्यवसाय सुरु करणाऱ्या उद्योगपतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये फायन्सियल सर्व्हिस कंपनी Zerodha चे सहसंस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांची जोडी अव्वल आहे. या यादीत 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या तरुण उद्योजकांचा समावेश आहे. ज्यांचा कोणताही वारसा नाही, त्यांनी स्वत: च्या ताकदीवर व्यवसाय उभा केला आहे आणि ज्यांची संपत्ती म्हणजे 1 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
OYO चे रितेश सर्वात तरूण
या यादीत टॉप असणाऱ्या नितीन कामत आणि निखिल कामत यांची एकूण संपत्ती सुमारे 24 हजार कोटी आहे. या यादीत त्यांच्यानंतर 38 वर्षीय दिव्यांक तुरखिया आहे. त्यांची संपत्ती 14,000 कोटी आहे. तर या यादीत 26 वर्षीय रितेश अग्रवाल हे सर्वात तरूण उद्योजक असून ते OYO रूम्सचे संस्थापक आहेत.
टॉप 10 यादी
या यादीतील टॉप 10 तरुण उद्योजकांचा समावेश आहे. त्यामध्ये नितीन आणि निखिल कामत (एकूण संपत्ती 24,000 कोटी रुपये), मीडिया डॉट नेटचे दिव्यांक तुरखिया (14,000 कोटी रुपये), Udaanचे संस्थापक अमोद मालवीय, सुजित कुमार आणि वैभव गुप्ता (13,000 कोटी रुपये), थिंक अँड लर्न्सचे रिजू रवींद्रन (7,800 कोटी रुपये), फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल (7,500 कोटी रुपये) आणि Oyo रूम्सचे रितेश अग्रवाल (4,500 कोटी रुपये) आहेत.
याचबरोबर, या यादीत दुसर्या स्थानावर असलेला 38 वर्षीय तुरखिया 2016 मध्ये बिलिनिअर बनले होते, त्यावेळी त्यांची कंपनी Media.net 1 अब्ज डॉलर्समध्ये विकली होती. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या Udaanचे संस्थापक अमोद मालवीय, सुजित कुमार आणि वैभव गुप्ता यांच्या संपत्तीत यावर्षी जवळपास 274 टक्क्यांनी वाढली आहे.
देविता सराफ एकमेव महिला
Vu टेक्नॉलॉजीजच्या संस्थापक 39 वर्षीय देविता सराफ या यादीत एकमेव महिला आहेत. या यादीमध्ये त्या 16 व्या स्थानावर आहे आणि त्यांची संपत्ती सुमारे 1200 कोटी आहे.
बंगळुरुमधील सर्वाधिक उद्योजक
या यादीतील जास्तीत जास्त 9 उद्योजक बंगळुरु शहरातील आहेत. गुरुग्राम आणि दिल्ली येथील 2-2 उद्योजक आहेत. तसेच, या यादीमध्ये देशाबाहेर राहून व्यवसाय करणाऱ्या दोन उद्योजकांचाही समावेश आहे.