वॉशिंग्टन: जागतिक बँकेपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोदी सरकारला मोठा धक्का दिला आहे. 2019-20 या कालावधीत भारताचा विकास दर 6.1 टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्के वेगानं वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 6.1 टक्के राहील, असा अंदाज आहे. त्यातुलनेत 2020 मध्ये भारताच्या विकासदरात वाढ होईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यानं वाढेल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर केवळ 3 टक्के असेल, असा अंदाज संस्थेनं व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी जगाची अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यानं वाढली होती.
चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एप्रिलमध्ये वर्तवला होता. यानंतर 3 महिन्यात यामध्ये 0.3 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आधी जागतिक बँकेनंदेखील भारताच्या जीडीपी वाढीचा दर घटवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.५ टक्के असेल, असा अंदाज एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जागतिक बँकेनं वर्तवला होता. मात्र आता त्यात कपात करुन जागतिक बँकेनं हा आकडा ६ टक्क्यांवर आणला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या मरगळ आली असून येत्या काही दिवसांत अर्थक्षेत्राची स्थिती आणखी खालावेल, असा धोक्याचा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. काही आर्थिक तिमाहांपूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा दर चीनपेक्षाही जास्त होता. तो आता बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर ७.५ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था केवळ ५ टक्क्यांनी वाढली. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे.
जागतिक बँकेपाठोपाठ IMFचा मोदी सरकारला धक्का; विकासदराच्या अंदाजात कपात
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:28 PM2019-10-15T20:28:24+5:302019-10-15T20:32:54+5:30