Join us

2027 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल; IMF च्या गीता गोपीनाथ यांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 2:53 PM

2027 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल; IMF च्या गीता गोपीनाथ यांचे भाकित

IMF on Indian Economy : केंद्रातील भाजप सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र आणि 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आता सरकारचे हे उद्दिष्ट IMF(आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) ने शक्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी IMF ने GDP वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरुन 7 टक्के केला आहे.

IMF च्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले की, "भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच, भारताचा आर्थिक विकास दर आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. भारताची अर्थव्यवस्था आमच्या अपक्षेपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळेच चांगल्या वाढीचा अंदाज वर्तवला जात आहे."

गीता गोपीनाथ यांनी विकास दर वाढीमागे अनेक तर्कही मांडले आहेत. त्या म्हणाल्या की, "देशातील दुचाकी विक्री आणि एफएमसीजी क्षेत्र कमबॅक करत आहे. यंदा मान्सूनही चांगला चालल्याचे दिसते, त्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे." विशेष म्हणजे, IMF ने GDP दर 7 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी आशियाई विकास बँकेने (ADB) देखील भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. बँकेने भारताचा GDP अंदाज 7 टक्के ठेवला आहे.

सरकारच्या अंदाजापेक्षा जास्तगीता गोपीनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलेला अंदाज, गेल्या महिन्यात भारत सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मांडलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. भारत सरकारने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवला आहे. तर आता गीता गोपीनाथ यांनी या अंदाजाच्या आधारे सांगितले की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारत