Join us  

IMF नं वर्तवलं भारताच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य; आकडे पाहून चीनची होईल पोटदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 9:29 AM

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला एक चांगली बातमी दिली आहे. एजन्सीनं सुरू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे.

IMF India GDP Growth : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला एक चांगली बातमी दिली आहे. एजन्सीनं सुरू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफनं भारताच्या जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आता तो ६.३ टक्के करण्यात आलाय. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये विक्रीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, यानंतर भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएमएफनुसार येणाऱ्या काळात भारत ही तेजीनं वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं आयएमएफचं म्हणणं आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजांनुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताचा विकास दर ६.५ टक्क्यांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.आयएमएफनं वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक जारी केलंय. यामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर पश्चिम आशियात निर्माण झालेली परिस्थिती आणि घटनांचा समावेश करण्यात आलेला नाही. आयएमएफनुसार भारताचा विकास दर मजबूत राहणार आहे. २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये तो ६.३ राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल जून तिमाहीमध्ये विक्रीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी ७.८ टक्क्यांच्या वेगानं वाढलाय. जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष २०२४ साठी भारताचा विकासदर ६.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय.

चीनला होणार पोटदुखीआयएमएफनं रियल इस्टेट क्षेत्रातील घसरणीचं कारण देत चीनसाठीचा अंदाज २०२३ साठी २० बेसिस पॉईंट्सनं कमी करून ५ टक्के आणि २०२४ साठी ३० बेसिस पॉईंट्सनं कमी करून ४.२ टक्के केलाय. कोरोना महासाथी नंतर सुरुवातीच्या काळात वेगानं सुधारणा झाल्यानंतर चीनयच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग मंदावला असल्याचं आयएमएफचं म्हणणं आहे. चीनचं रियल इस्टेटम मार्केट संकटाचा सामना करत असून लोकही खर्च करण्याच्या स्थितीत नाहीत. अमेरिकेचा विकास दर २०२३ मध्ये २.१ टक्के आणि २०२४ मध्ये १.५ टक्क्यांवर राहू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतचीन