Join us  

लगेच बदलून घ्या गुलाबी नोट; ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 6:57 AM

२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या मोहिमेला रिझर्व्ह बँकेने शनिवारी एक आठवड्याची म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या मोहिमेला रिझर्व्ह बँकेने शनिवारी एक आठवड्याची म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता नागरिक या तारखेपर्यंत आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतील. मात्र, ही मुदत संपल्यानंतर त्या आता केवळ रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांतच बदलून दिल्या जातील. बँक शाखांत त्या जमा केल्या जाऊ शकणार नाहीत, तसेच बदलूनही दिल्या जाणार नाहीत.

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी घेतला होता. नोटा परत करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अखेरची मुदत होती.

कधी आली हाेती नाेट बाजारात?

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाेव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नाेटा बंद करण्याची घाेषणा केली हाेती. त्यावेळी सर्वप्रथम २ हजार रुपयांची गुलाबी नाेट चलनात आणली हाेती. त्यानंतर ५०० रुपयांचीही नवी नोट चलनात आणली. त्यापाठोपाठ २००, १००, ५० आणि २० रुपयांच्याही नव्या नोटा आरबीआयने बाजारात आणल्या.

किती नोटा केल्या परत?

३.४२ लाख कोटी

रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा आतापर्यंत नागरिकांनी बँकांना परत केल्या आहेत. या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या आहेत अथवा बदलून घेण्यात आल्या आहेत.

३.५६ लाख कोटी

रुपये मूल्याच्या नाेटा १९ मे २०२३पर्यंत चलनात हाेत्या.

०.१४ लाख कोटी

रुपये मूल्याच्याच नाेटा सध्या बाजारात आहेत.

३८ कोटी

गुलाबी नाेटा २०२१-२२ मध्ये नष्ट करण्यात आल्या हाेत्या. २०१८-१९ पासून या नाेटांची छपाई बंद करण्यात आली हाेती.