रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. लग्नाच्या ३२ वर्षानंतर ते पत्नी नवाज मोदी-सिंघानिया यांना घटस्फोट देणार असल्याची खुद्द गौतम सिंघानिया यांनी एका पोस्टद्वारे दिली होती. मात्र याचा परिणाम आता रेमंड कंपनी आणि त्यांच्या गुंतवणूकदरांवर होताना दिसतो. कंपनीचं नाव आता बँकर्स आणि शेअरधारकांवर अवलंबून असल्याची प्रतिक्रिया गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी दिली.
"गौतम रेमंडला तोडत आहेत आणि याचं मला दु:ख होतंय. मी माझं जीवन जगलोय. त्यांना काय करायला हवं. त्यांना आपलं ध्येय स्वत: ठरवायला हवं," असं गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी-सिंघानिया यांच्या घटस्फोटाबाबत बोलताना विजयपत सिंघानिया म्हणाले."अशा प्रकारे भांडून त्यांना काही मिळणार नाही. मग ७५ टक्के हिस्सा का मागितला जातोय. प्रत्येकाला आणि सर्वकाही विकत घेणं हे त्यांचं लक्ष्य आहे. जिथपर्यंत मला कल्पना आहे कोणताही छोटा वकील हिंदू विवाह कायद्यांतर्गत ५० टक्क्यांपर्यंत हिस्सा मिळवून देऊ शकतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी नवाज मोदी यांच्याबाबत बोलताना दिली. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. रेमंड उभारण्यासाठी मोठा काळ"रेमंडला उभं करण्यासाठी मोठा काळ गेला. जेव्हा आम्ही ही कंपनी खरेदी केली होती तेव्हा ती ब्लँकेट तयार करणार छोटी कंपनी होती. त्यानंतर मी याची धुरा सांभाळली आणि आज ही जगभरातील प्रसिद्ध कंपनी आहे," असं विजयपत सिंघानिया म्हणाले. गौतम सिंघानिया यांच्याकडे कंपनीची धुरा सोपवल्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये राजीनामा दिला होता.वडील आणि मुलातही बिनसलंविजयपत सिंघानिया आणि गौतम यांच्यात संपत्तीवरून आणि इतर अनेक कारणांवरून काही काळ मतभेद झाले होते. २००७ च्या कौटुंबिक समझोत्यानुसार, विजयपत सिंघानिया, त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आणि त्यांचे भाऊ अजयपत सिंघानिया यांची पत्नी आणि दोन मुले यांना जेके हाऊसमध्ये प्रत्येकी एक डुप्लेक्स मिळत होता. पण, विजयपत सिंघानिया यांनी २०१७ मध्ये आरोप केला होता की, रेमंडने दक्षिण मुंबईतील बहुमजली जेके हाऊस इमारतीतील डुप्लेक्सचा ताबा त्यांना दिला नव्हता.