Join us

Reserve Bank Repo Rate : रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची वाढ, पाहा किती वाढणार तुमचा ईएमआय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:21 PM

Reserve Bank Repo Rate EMI: रेपो दरात वाढ झाल्याने आगामी काळात कर्जाचे व्याजदर वाढणार हे जवळपास निश्चित आहे. येत्या काळात तुमच्या खिशावर ईएमआयचा किती परिणाम होईल हे पाहू.

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंट्सची वाढ केल्याची घोषणा केली. ही वाढ तात्काळ प्रभावानं लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवल्यामुळे त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार हे जवळपास निश्चितच आहे. ही वाढ कशा प्रमाणात लागू करायची याचा निर्णय बँकाच घेत असतात. परंतु सध्या यात ०.५० बेसिस पॉईंट्सची वाढ झाल्यानं तुमचा ईएमआय किती वाढणार हे पाहुया.

२० वर्षांसाठी जर तुम्ही ३० लाख रुपयांचं कर्ज घेतलं असेल, तर तुमचा ईएमआय १६८० रूपयांनी वाढेल. एचडीएफसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार ७.५५ टक्क्यांच्या व्याजदरानुसार हा ईएमआय २४२६० रूपये असेल. जर कोणतीही व्यक्ती या वाढीनंतर कर्ज घेत असेल, तर त्याला याच रकमेसाठी २५९४० रूपयांचा ईएमआय द्यावा लागेल. म्हणजेच नव्या दरांनुसार ईएमआय १६८० रूपये प्रति महिन्यानं वाढेल आणि २० वर्षांच्या कालावधीत नव्या ग्राहकाला ४ लाख रूपये अतिरिक्त व्याज द्यावं लागेल.

विद्यमान ग्राहकांवर याचा कोणता परिणाम होईल हे त्यांनी निवडलेल्या व्याजदरावर अवलंबून असेल. कर्ज हे दोन प्रकारच्या व्याजदरावर दिलं जातं. एक म्हणजे फिक्स्ड आणि दुसरं म्हणजे फ्लोटिंग. आजकाल अनेकजण फिक्स्ड व्याजदरावर कर्ज घेम्यास प्राधान्य देतात. जर तुमचा व्याजदर फिक्स असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. परंतु तुम्ही फ्लोटिंग दरानं कर्ज घेतलं असेल, तर तुमचा ईएमआय वाढू शकतो.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासबँक