Join us

नव्या राेजगारांना फटका, १.०९ कोटी जणांच्या हातांना काम; सांख्यिकी मंत्रालयाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:54 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (इपीएफओ) एकूण नवीन सदस्यांची संख्या मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (इपीएफओ) एकूण नवीन सदस्यांची संख्या मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. या वर्षात १.०९ कोटी जणांच्या हाताला काम मिळाले. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

‘पे रोल रिपोर्टिंग इन इंडिया

ॲन एम्प्लॉयमेंट पर्स्पेक्टिव्ह, जानेवारी टू एप्रिल २०२४’ या अहवालानुसार ईपीएफओमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १,१४,९८,४५३ नवे सदस्य जोडले, तर २०२३-२४ या वर्षात संख्या घटून १,०९,९३,११९ वर आली आहे. कोरोना महामारीमुळे २०२०-२१ मध्ये ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या नवीन सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. या वर्षात ८५,४८,८९८ नवे सदस्य जोडले गेले. या आधीच्या वर्षात म्हणजे २०१९-२० मध्ये १,१०,४०,६८३ नवीन सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले होते. तर २०२१-२२ मध्ये ईपीएफओमध्ये सामील झालेल्या नवीन सदस्यांची संख्या १,०८,६५,०६३ इतकी होती. 

एनपीएस सदस्य मात्र वाढले

अहवालात असेही दिसून आले, की कर्मचारी राज्य विमा महामंडळ (इएसआयसी) सदस्यांची एकूण वाढही घसरली आहे. २०२२-२३ मध्ये सदस्यसंख्या १,६७,७३,०२३ इतकी होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या घसरून १,६७,६०,६७२ वर आली. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत नवीन सदस्याची संख्या २०२२-२३ मध्ये ८,२४,७३५ इतकी होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या वाढून ९,३७,०२० वर पोहोचली आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम झाला. मागील पाच वर्षांत ईपीएफओमध्ये जोडले गेलेल्या नव्या सदस्यांची संख्या कोविडपूर्व काळाच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. २०१८-१९ या वर्षात एकूण १,३९,४४,३४९  नवे सदस्य जोडले गेले होते.

टॅग्स :नोकरीसरकार