नवी दिल्ली : यंदाही कमी उत्पादन आणि अजूनही असलेले चढे भाव यामुळे चिंतित झालेल्या सरकारने पाच हजार टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर डाळीच्या स्थानिक पुरवठ्यासाठी सरकारने पाच हजार टन आयातीचे टेंडर जारी केले आहे.
सरकार नियंत्रित एमएमटीसीने पाच हजार टन तूर डाळीच्या आयातीसाठी टेंडर जारी केले असून, दर पाहून ही आयात आणखी वाढविली जाऊ शकते.
२०१५ च्या तुलनेत २०१६ मध्येही तूर डाळीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी भाववाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सरकारने स्थानिक पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आणि भाववाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डाळींची आयात करण्याचा निर्णय एमएमटीसीला दिला आहे. सध्या बाजारात तूर डाळीचे भाव १८० रुपये प्रति किलो आहेत.
म्यानमार, मलावी आणि मोझांबिक किंवा अन्य कोणत्याही प्रदेशातून पाच हजार टन ताज्या तूर डाळीची आयात करण्यासाठी जागतिक निविदा मागविण्यात येत आहेत, असे या निविदेत म्हटले आहे.
तांत्रिक आणि भावाबाबतच्या निविदा १८ जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २२ जानेवारीपर्यंत निविदा खुली राहील. कमीत कमी २ हजार टन डाळीचा पुरवठा करावा लागेल. तूर डाळ घेऊन येणारे जहाज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि चेन्नई बंदर येथे ७ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान पोहोचणे आवश्यक आहे, असे निविदेत स्पष्ट करण्यात आले आहे. एमएमटीसीने गेल्यावर्षीही भाववाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाच हजार टन तूर डाळ आयात केली होती. मात्र, उडीद डाळीसाठी कोठूनही प्रतिसाद मिळाला नव्हता.
यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच डाळींचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊन भाववाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अन्न आणि पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी अलीकडेच वाणिज्य मंत्रालयाला डाळींच्या आयातीबाबत सूचना केली होती. कमी पावसामुळे रबीचा पेरा कमी झाला. परिणामत: २०१५-१६ (जुलै-जून) या पीक वर्षातही अपेक्षेपेक्षा डाळींचे उत्पादन कमी होऊन ते १८ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्येही केवळ १७.३८ दशलक्ष टन डाळींचे उत्पादन झाले होते.
मर्यादित पुरवठा व वितरकांनी सतत केलेल्या लिलावामुळे डाळ बाजारात तूर व इतर निवडक वस्तूंच्या दरात दोनशे रुपये प्रति क्विंटल तेजी नोंदली गेली. किरकोळ बाजारातील मागणी वाढल्याचाही हा परिणाम असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले.
तूर डाळीचा भाव २०० रुपयांनी वाढून ९,२०० रुपये प्रति क्विंटल बंद झाला. उडीद डाळ व तुकडा उडीद भावात १०० रुपये वाढ झाली. या डाळींचे भाव अनुक्रमे ९,०५० ते १० हजार ५० रुपये, तर १० हजार १०० ते १० हजार ३०० रुपये बंद झाला. मसूर लहान व मोठा दोन्हीतही ५० रुपयांची वाढ झाली. मसूरचे भाव अनुक्रमे ६,८०० ते ७,००० व ६,९०० ते ७,१०० बंद झाले.
५ हजार टन डाळ आयात करणार
यंदाही कमी उत्पादन आणि अजूनही असलेले चढे भाव यामुळे चिंतित झालेल्या सरकारने पाच हजार टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
By admin | Published: January 5, 2016 11:49 PM2016-01-05T23:49:18+5:302016-01-05T23:49:18+5:30