Join us  

‘एच-१बी’ व्हिसाचे महत्त्व घटले

By admin | Published: July 16, 2016 2:57 AM

तंत्रज्ञानाच्या काळात आता अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा आता पूर्वीइतका महत्त्वपूर्ण राहिलेला नाही, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संघटना नासकॉमने म्हटले आहे.

कोलकता : तंत्रज्ञानाच्या काळात आता अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा आता पूर्वीइतका महत्त्वपूर्ण राहिलेला नाही, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संघटना नासकॉमने म्हटले आहे. एच-१बी व्हिसा हा कामकाजी व्हिसा आहे. अमेरिकेत नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांना तो दिला जातो. अमेरिकेतील तरुणांच्या नोकऱ्यांवर बाहेरच्या देशातील तरुण आक्रमण करीत असल्याचा आरोप गेली काही वर्षे अमेरिकेत होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका नवे आगमन विधेयक आणणार आहे. यात एच-१बी व्हिसावर अनेक बंधने येणार आहेत, अशी चर्चा आहे. या व्हिसावर भारतातून मोठ्या प्रमाणात तरुण अमेरिकेत जातात. त्याच्यावर बंधने आल्यानंतर भारतीय तरुणांच्या संधी मर्यादित होतील, असे बोलले जात आहे. नासकॉमने मात्र हा मुद्दाच फेटाळून लावला आहे. नासकॉमचे अध्यक्ष सी.पी. गुरनानी यांनी पत्रकारांना सांगितले की, तंत्रज्ञानाच्या या काळात एन-१बी व्हिसा आता तेवढा महत्त्वपूर्ण राहिलेला नाही. कंपन्या आपल्या उत्पादन आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी उपकरणांचा उपयोग करतील. नासकॉम उत्पादन संमेलनात गुरनानी यांनी सांगितले की, अमेरिकी कंपन्या आणि अमेरिकी सिनेट एकमेकांच्या विरोधात उभ्या राहू शकतात. अमेरिकी कंपन्यांना माहिती आहे की, त्यांचे ७0 टक्के काम देशाबाहेरच होत आहे. याशिवाय व्हिसाचा खर्चही आता वाढत चालला आहे. नासकॉम अमेरिकी सरकारला आवाहन करील. खरे म्हणजे कंपन्या अजूनही पूर्वीप्रमाणेच काम करीत राहतील. त्यात अद्याप काही बदल होणार नाही. गुरनानी म्हणाले की, तंत्रज्ञान खरेदी करणे हे आपल्या हिताचे आहे. नासकॉमच्या आकडेवारीनुसार भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्न अमेरिकेतून येते. नासकॉमने मॅकिंजीसोबत केलेल्या सर्वेक्षणानुसार २0२५ सालापर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पन्न २५0 अब्ज डॉलरवर जाईल.