Join us

IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, आता शेअर्स लिस्ट होण्यापूर्वीच विकता येणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:33 IST

IPO Investment: आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये अलॉट झालेल्या शेअर्सची लिस्टिंगपूर्वीच विक्री करता येणारे.

IPO Investment : आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये अलॉट झालेल्या शेअर्सची लिस्टिंगपूर्वीच विक्री करता येणारे. बाजार नियामक सेबी अशी प्रणाली आणण्याचा विचार करत आहे जिथे गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉट होताच त्यांची विक्री करू शकतील. 

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. अनऑथोराईज्ड मार्केट अॅक्टिव्हिटीज रोखण्यासाठी हे केले जात आहे. शीर्ष दोन प्रॉक्सी सल्लागार कंपन्या एक पोर्टल सुरू करणार आहेत जे संबंधित पक्षाच्या व्यवहारांसाठी भांडार म्हणून काम करतील आणि भागधारकांना कंपनीतील प्रशासकीय मापदंडांचे मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असंही त्या म्हणाल्या.

अलीकडच्या काळात अनेक आयपीओंमध्ये भरपूर सब्सक्रिप्शन पाहायला मिळालं असून अनेकवेळा शेअर्सच्या लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. अशा तऱ्हेनं अनधिकृत बाजारातील हालचालीही वाढल्या असून, वाटप झाल्यास पूर्वनिर्धारित अटींच्या आधारे शेअर्सची विक्री करता येणार आहे. गुंतवणूकदारांना तसं करायचं असेल, तर त्यांना योग्य पद्धतीने ती संधी का देऊ नये, असे आम्हाला वाटते. 'जो काही बेकायदा बाजार सुरू आहे, तो योग्य नाही, असं आम्हाला वाटतं. जर तुम्हाला अलॉटमेंट मिळालं असेल आणि तुम्हाला ते विकायचं असेल तर ते बाजारात विकून टाका, असंही बुच म्हणाल्या.

IPO बुम कंट्रोल करण्याची तयारी

भारतातील आयपीओच्या तेजीदरम्यान हे वक्तव्य समोर आलंय. अॅनालिटिक्स फर्म प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ९१ मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आणि आयपीओच्या माध्यमातून विक्रमी १.६ ट्रिलियन रुपये उभे केले. दरम्यान, गुंतवणूकदारांचा विश्वास सेबीच्या केंद्रस्थानी आहे. पारदर्शकता आणि जोखीम कमी करण्याचा योग्य मार्ग आयपीओ टप्प्यापासूनच सुरू झाला पाहिजे यावर बुच यांनी भर दिला.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबीमाधबी पुरी बुच