लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत, कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करून ते काय साध्य करू शकतात हे जगाला दाखविले आहे, अशा शब्दांत किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात दाखविलेल्या अमर्याद विश्वासाचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
देशातील सर्वांत मोठी भांडार संस्था असलेल्या एनएसडीएल अर्थात राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादितच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. २०१९-२० मध्ये दर महिन्यात सरासरी चार लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली. २०२०-२१ मध्ये या संख्येत तिपटीने वाढ होऊन ती दर महिन्याला १२ लाख इतकी झाली, तर, २०२१-२२ मध्ये दर महिन्याला सुमारे २६ लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
या कार्यक्रमात, सीतारामन यांनी ‘मार्केट का एकलव्य’ या हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ऑनलाईन गुंतवणूकदार जागृती कार्यक्रमाची सुरुवात केली. सध्या लोकांमध्ये शेअर बाजाराविषयी जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे असा मंच सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील फिनटेक कंपन्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आणि भारत या क्षेत्रात बजावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेबद्दल सीतारामन यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी विशेष टपाल कव्हरचेही प्रकाशन केले.
एनएसडीएलने १९९६ मध्ये भारतात पहिले डीमॅट उघडले. एनएसडीएलची संपूर्ण भारतामध्ये ५७ हजार सेवा केंद्र आहेत. त्यात २७ दशलक्षाहून अधिक डीमॅट खाती आहेत आणि त्यातील ठेवींचे मूल्य चार ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक असल्याची माहिती एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पद्मजा चंद्रू यांनी दिली.
डीएलटी ब्लॉकचेन तंत्रज्ञानसेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी डिबेंचर कोव्हेनन्ट मॉनिटरिंगसाठी असलेल्या एनएसडीएलच्या डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) ब्लॉकचेन मंचाचे अनावरणही याच कार्यक्रमात केले. ‘डीमॅट’ क्रांती ही संपूर्ण बाजारपेठेने स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाची पहिली पायरी होती. आम्ही बाजारात डीएलटीच्या वापराच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आहोत, म्हणून हा दिवस संस्मरणीय ठरेल, असे सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या.