तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारकडून येत्या २३ जुलैला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. २२ जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट २०२४ सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या बजेटमध्ये काय काय असणार याबाबत अंदाज लावले जात आहेत. नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झाली होती. आता या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट मिळण्याची शक्यता आहे.
एलपीजी सबसिडीची मुदत वाढविणे, विविध वस्तूंवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांच्या निधीत ६००० वरून वर्षाला ८००० रुपयांची वाढ करणे आदी घोषणा केल्या जातील असा अंदाज आहे. तसेच ग्रामीण आवास योजनेतील राज्यांचा वाटा ५० टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
निर्मला सीतारामन यांच्या नावावर अनोखा विक्रम...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. सीतारामन या मोरारजी देसाईंना मागे टाकणार असून देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते.