नवी दिल्ली : चीनमधील वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी अनेक मोहिमा चालविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मोदी सरकारच्या काळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही माहिती लोकसभेत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे. काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर (चंद्रपूर) यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. २०१४ ते २०२१ या काळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंचे प्रमाण किती आहे, अशी विचारणा खासदार धानोरकर यांनी केली होती. केंद्र सरकारने २०१४मध्ये चीनमधून ६०.४१ दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात झाली होती. यानंतर प्रत्येक वर्षी यात वाढ होत गेली आहे. २०१५ - १६मध्ये ६१.७१, २०१७ - १८मध्ये ७६.३८ दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात झाली होती. २०२० - २१ या वर्षात ही आयात ६५.२१ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी झाली होती, अशी माहिती पियूष गोयल यांनी दिली. आयातीमध्ये तब्बल १९२ टक्के वाढडॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापेक्षा ही वाढ जवळपास १९२ टक्के अधिक आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये दूरसंचार उपकरणे, संगणक हार्डवेअर, खते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, औषधी, वीज उपकरणांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीतही वाढ झाल्याचे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. २०१४ - १५मध्ये देशातून चीनमध्ये ११.९१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची निर्यात झाली.
मोदी सरकार सत्तेवर येताच चीनमधून आयात वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:24 AM