Join us

कॉक्स आणि किंग्जच्या पाच ठिकाणांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:24 AM

येस बँक प्रकरण : हजारो कोटींच्या घोटाळ्यात सहभाग

मुंबई : येस बॅँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी असलेल्या कॉक्स आणि किंग्जच्या मुंबईतील पाच ठिकाणांवर छापे टाकले आहेत. संबंधित ठिकाणांहून महत्वपूर्ण दस्तावेजही जप्त करण्यात आले आहेत. येस बँक प्रकरणी दाखल मनी लॉडरिंग प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. याच प्रकरणात येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली असून, याबाबत पहिले आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. नंतर या कंपनीने २,२६० कोटींचा घोटाळा केला. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुंबई आणि यूकेमध्ये मुख्यालय आहे. कॉक्स अँड किंग्ज लि.चे कार्य २२ देश आणि ४ खंडांमध्ये पसरले आहे.देशातील बड्या उद्योजकांशी आर्थिक व्यवहारदेश-विदेशात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या राणा कपूर यांच्या कुटुंबियांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराशेजारी तब्बल १२७ कोटींचा बंगला विकत घेतला आहे. देशातील बड्या उद्योजकांशी येस बँकेचे मोठे आर्थिक व्यवहार केले असून अनिल अंबानी ग्रुपकडे बँकेचे १३ हजार कोटी, सुभाष चंद्रा यांच्या एस्सेल गु्रपकडे ३ हजार ३०० कोटी, रेडियस डेव्हलपर्सकडे १ हजार २०० कोटी, डीएचएफएल ग्रुपकडे ३ हजार ७०० कोटी आणि आरकेडब्लूकडे १ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळते. याबाबत ईडीकडून चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :मुंबईयेस बँक