Join us

‘अल्पबचत’च्या व्याजदरात लवकरच सुधारणा

By admin | Published: February 12, 2016 3:46 AM

बाजारदराशी सुसंगत करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सुधारणा करू शकते; मात्र बालिका आणि ज्येष्ठ नागरिकांशी निगडित

नवी दिल्ली : बाजारदराशी सुसंगत करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सुधारणा करू शकते; मात्र बालिका आणि ज्येष्ठ नागरिकांशी निगडित योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आर्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, एक-दोन दिवसांत अधिसूचना किंवा कार्यकारी आदेश जारी करण्यात येईल. बाजार दराशी सुसंगत व्याजदर करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. सर्वसाधारणपणे अल्पबचत योजनांचे व्याजदर सरकारी रोख्यांशी सुसंगत असतात. वार्षिक आधारावर त्यांचे समायोजन केले जाते; पण आता ते दर तीन महिन्याला समायोजित केले जाईल. दास म्हणाले की, नवीन दर एप्रिल २0१६ पासून लागू होतील. या बदलांचा परिणाम एक एप्रिलपासून दिसेल. अल्पबचत योजनांत टपाल विभागातील मासिक उत्पन्न योजना, पीपीएफ, ठराविक मुदतीच्या पोस्टातील ठेवी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी खाते आदींचा समावेश होतो.दास पुढे म्हणाले की, सामाजिक क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण बाबी ध्यानात घेऊन बालिका आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर आहे तसेच राहतील. रिझर्व्ह बँक जे काही धोरणात्मक व्याजदर जाहीर केले, त्यांचा लाभ या अल्पबचत योजना घेऊ शकतील. सरकारने अल्पबचत योजनांच्या फायद्याचा विचार केला असून, दीर्घकालीन बचत योजनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी जानेवारीपासून व्याजदरात १.२५ टक्के कपात केली असली तरी बँकांनी ग्राहकांसाठी केवळ 0.७0 टक्के व्याजदर कपात केली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.