Join us

सुधारणांची गती वाढायला हवी...!

By admin | Published: January 23, 2016 3:46 AM

भारतात आर्थिक सुधारणा होत असून त्यांची दिशाही योग्य आहे, पण देशात अनेक जुनाट कायदे असल्यामुळे सुधारणांना हवी तशी गती नसल्याची टीका रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली

दाओस : भारतात आर्थिक सुधारणा होत असून त्यांची दिशाही योग्य आहे, पण देशात अनेक जुनाट कायदे असल्यामुळे सुधारणांना हवी तशी गती नसल्याची टीका रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. राजन जागतिक आर्थिक मंच बैठकीसाठी येथे आले असून गुरुवारी ते ब्लूमर्ग टीव्हीशी बोलत होते. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर रघुराम राजन आणि सरकारचे संबंध तणावाचे होते. या पार्श्वभूमीवर राजन यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते.ते म्हणाले की, जुने कायदे बदलण्याची गरज असली तरी एका झटक्यात ते शक्य नाही. त्यासाठी वेळ लागेल. पण उद्योग, व्यापारासाठी हे लवकर करावे लागेल. उद्योगांमध्ये नवनवीन संकल्पना येत असून त्याही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. लोक केवळ मोठ्या बदलावर चर्चा करतात, पण ज्या सुधारणांवर सध्या काम सुरू आहे त्यावर अजिबात बोलत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्तकेली. जग हळूहळू मंदीतून बाहेर येत आहे, असे मला वाटते. भारताचा मात्र स्थिर विकास होतो आहे. कोणी आपल्या जीडीपीचा आकडा कमी की जास्ती याची चर्चा करील, पण साधारणपणे आकडेवारी अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य दाखविते. आपला विकास होतो आहे. काही जणांनी ‘जीएसटी’सारख्या प्रतिमांचा आधार घेत त्यावरच आपल्या अपेक्षा असल्याचे सांगितले; पण सुधारणा होते आहे हे नाकारून चालणार नाही, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, आर्थिक क्षेत्रात आगामी वर्षात भारतात २१ नव्या बँका सुरू होतील. याचा अर्थ अनेक रोजगार निर्माण होतील, नवे उपक्रम होतील. आर्थिक व्यवस्थेत अनेक नवे लोक येतील. जगभरात तेलाचे भाव कोसळत आहेत. आशियातील शेअर बाजारात मंदी आहे, याबाबत ते म्हणाले की, हे नेहमीसारखे नाही. तेलाचे भाव का कोसळत आहेत? तुम्ही पाहिले तर चीनचा तेलाचा वापर कमी झालेला नाही. भारतातही तशी स्थिती नाही. अचानकपणे तेलाचा वापर वा मागणी कमी झालेली नाही. सध्या पुरवठा वाढला असून त्यामुळे हे घडते आहे. त्यामुळे खरेदीची सत्ता विक्रेत्यांकडून तेल खरेदीदारांकडे स्थलांतरित झाली आहे. कालांतराने यात बदल होईल.