Join us

१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 06, 2024 9:30 AM

Marriage News: गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू- वरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागकर्त्यांनी १६ लग्नतिथी दिल्या आहेत.

- प्रशांत तेलवाडकरसंभाजीनगर -गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू- वरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागकर्त्यांनी १६ लग्नतिथी दिल्या आहेत. या मुहूर्तावर देशभरात तब्बल ४८ लाख लग्न लावण्यात येणार आहे. यातून ६ लाख कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी उभारी मिळणार आहे. 

दिवाळीच्या उलाढालीनंतर आता सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लग्न हंगामाकडे लागले आहे. चातुर्मास समाप्ती बुधवारी (दि. १३ नोव्हेंबर) आहे आणि त्याच दिवशी तुलसी विवाहाला सुरुवात होईल. तसेच, रविवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) लग्न हंगामाचा प्रारंभ होईल. १५ डिसेंबर पर्यंत १६ लग्नतिथी आहेत. लग्न हंगामासंदर्भात  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने एक अहवाल जाहीर केला आहे. त्यात या १६ लग्नतिथीत देशभरात ४८ लाख लग्न होतील. त्यात ६ लाख कोटींची उलाढाल होईल, असे म्हटले आहे. 

२५ दिवसांत तयार झाला अहवाल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटना दरवर्षी दिवाळी हंगामाचा अहवाल जाहीर करीत असते. यंदाही सर्व राज्यांतील राज्यस्तरीय व्यापारी संघटनांकडून अहवाल मागविण्यात आला. अहवाल तयार करण्यासाठी २५ दिवस लागले. मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान ११ मुहूर्त होते व ३५ लाख लग्न लागले. यातून ४.२५ लाख कोटींची उलाढाल बाजारपेठेत झाली होती. भारतीय अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास लग्नसराईचा मोठा वाटा असतो. एका लग्नात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ४५० ते ४७५ लोकांना काम मिळते.  - अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

 

 

टॅग्स :लग्नव्यवसायपैसा