लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी केल्याच्या घोषणेनंतर या मौल्यवान धातूंचे भाव कमी-कमी होत आहेत. शुक्रवारी सोने ६९ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदी ८२ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. गेल्या आठ दिवसांत सोने पाच हजार, तर चांदी ११ हजार रुपयांनी घसरली आहे.
मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आली. मंगळवारपासूनच भाव कमी होण्यास सुरुवात झाली. बुधवारी सोने ७०० रुपयांनी घसरले व गुरुवारी पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६९ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
शुक्रवारी ते याच भावावर स्थिर होते. मात्र, गेल्या आठवडाभरातील स्थिती पाहिली, तर १८ जुलै रोजी सोने ७४ हजार ५०० रुपयांवर होते. आठ दिवसांत सोने ७४ हजार ५०० रुपयांवरून शुक्रवारी ६९ हजार ५०० रुपयांवर आले. दुसरीकडे, चांदीच्याही भावात गुरुवारी थेट तीन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार ५०० रुपयांवर आली होती.
शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाल्याने चांदी ८२ हजार रुपयांवर आली. १८ जुलै रोजी चांदी ९३ हजार रुपये प्रतिकिलोवर होती, आठ दिवसांत ११ हजार रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.