लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या खपासोबत विमा घेणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. पॉलिसी बाजारच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ईव्हीसाठी विमा पॉलिसीची मागणी तब्बल १६ पटींनी वाढली आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये नागरिक ईव्ही इलेक्ट्रिक गाड्या घेताना त्यांच्या सुरक्षेचा विचार करून विमाही प्राधान्याने घेत आहेत.
या अहवालात म्हटले आहे की, ईव्ही कारसाठी विमा पॉलिसीचा हिस्सा २०२३ या आर्थिक वर्षात फक्त ०.५ टक्के इतका होता. २०२४ मध्ये हा हिस्सा वाढून ३.५ टक्के इतका झाला आहे. मार्च २०२५ पर्यंत हा हिस्सा ८.२ टक्केपर्यंत वाढला आहे, म्हणजेच तीन वर्षांत हा वाटा झपाट्याने वाढला आहे.
विमा ॲड-ऑन्सची मागणी का वाढली?
नागरिक आपल्या गाड्यांची संपूर्ण सुरक्षा पाहत असल्याने विम्यात ॲड-ऑनची मागणीही वाढत आहे. ईव्ही कारमालक विमा घेताना झिरो डेप्रिशिएशन, रोड साइड असिस्टन्स, बॅटरी कव्हर आणि टायर प्रोटेक्शनसारखे पर्याय निवडत आहेत.
ई-बाइकसाठी बॅटरी प्रोटेक्शन आणि चार्जर कव्हरला प्राधान्य दिले जात आहे. या ॲड-ऑनमुळे महागडी बॅटरी आणि इतर भागांचे नुकसान टाळण्यास मदत होते.
टॉप ५ शहरांतील प्रमाण
- दिल्ली-एनसीआर १८.३%
- बंगळुरू १६%
- पुणे ७.६%
- चेन्नई ६.७%
- मुंबई-ठाणे ६.४%
मोठ्या नुकसानीचे दावे होत आहेत दाखल
- ईव्ही कार विमा दाव्यांचे प्रमाण सामान्य वाहनांपेक्षा अधिक आहे. यामागचे कारण म्हणजे बॅटरींची चोरी आणि चार्जिंग करताना गाडीमध्ये आगीच्या वाढलेल्या घटना हे आहे.
- बॅटरींची चोरी वाढली आहे. तसेच चार्जिंगदरम्यान ओव्हरहिटिंगमुळे आगीच्या घटनाही घडल्या आहेत. या नुकसानीमुळे मोठ्या नुकसानीचे दावे दाखल होत आहेत.
- ईव्ही विम्याची क्रेझ मोठ्या शहरांमध्ये आहे. ५ मोठ्या शहरांमधून निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे ५५% पॉलिसी काढल्या आहेत. टियर-१ शहरे ५८ टक्के पॉलिसींसह आघाडीवर आहेत. तर टियर-२ शहरांचा वाटा ३० टक्के आहे.
देशातील बलाढ्य कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न किती कोटी?
भारतातील सर्वांत मोठ्या कंपन्या दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न कमावतात. रिलायन्स इंडस्ट्रीज वार्षिक उत्पन्न कमावण्याच्या बाबतीत सर्वांत आघाडीवर आहे. त्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न एचडीएफसी बँक आणि टाटा मोटर्सचे आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या टॉप १० आस्थापनांमध्ये आयसीआयसीआय बँकेचाही समावेश आहे. पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एल अँड टी या कंपनीनेही उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या १० कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.