नवी दिल्ली : देशाच्या आयटी क्षेत्रात वेगळेच युद्ध सुरू झाले आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडूनच उच्चाधिकाऱ्यांच्या पळवापळवीचा आराेप कंपन्यांनी केला असून अशा कर्मचाऱ्यांना यासंदर्भात नाेटिसाही दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना आपल्याकडे ओढून घेताना चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याचा आराेप या कंपन्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी विप्राेच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने राजीनामा देऊन ‘काॅग्निझंट’मध्ये रुजू झाले. यावरून विप्राेने काॅग्निझंटला नाेटीस दिली आहे. दुसरीकडे इन्फाेसिसचे वरिष्ठ कर्मचारी काॅग्निझंटमध्ये रुजू झाले. आयटी कंपन्यांमध्ये एकमेकांकडील प्रतिभावान कर्मचाऱ्यांना ओढण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. नजीकच्या काळात दिग्गज आयटी कंपन्यांमध्ये अशा प्रकारचा वाद वाढण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
नाेटिसीत काय म्हटले?
कर्मचाऱ्यांचे ‘पाेचिंग’ करून आघाडीच्या कर्मचाऱ्यांना कंपनी आपल्याकडे ओढत आहे, असे इन्फाेसिसने नाेटिसीत म्हटले आहे. आतापर्यंत इन्फाेसिसचे चार उच्च अधिकारी काॅग्निझंटमध्ये उच्च पदांवर रुजू झाले आहेत. काॅग्निझंटने २० जणांना उच्च पदावर नियुक्त केले आहे. त्यात एक कार्यकारी उपाध्यक्ष आणि चार उपाध्यक्ष आहेत.
नाेकरभरतीत कंपन्या टाळतात प्रतिस्पर्धा
आयटी कंपन्यांमध्ये नाॅन काॅम्पिट क्लाॅज लागू आहे. मात्र, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये ताे लागू हाेत नाही. तरीही अनेक आयटी कंपन्या नाेकरभरतीत प्रतिस्पर्धा टाळतात. विप्राे आणि इन्फाेसिसमधून गेल्या वर्षभरात १५ उच्च पदस्थ अधिकारी बाहेर पडले आहेत.
गाेपनीय माहिती चाेरल्याचा आराेप
कर्मचाऱ्यांनी नाेकरी बदलणे सर्वसामान्य बाब आहे. मात्र, यावरुन तीन कंपन्या आपसात भिडल्या आहेत. विप्राेने दाेन अधिकाऱ्यांवर अमेरिका आणि भारतात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एका अधिकाऱ्यावर कंपनीची गाेपनीय माहिती चाेरल्याचाही आराेप केला आहे.