नवी दिल्ली : जगभरात या वर्षी विविध क्षेत्रांमध्ये तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. या टेक कंपन्यांमधील कपात जास्त आहे. हा आकडा येणाऱ्या काळात आणखी वाढणार आहे. कारण, मेटा, बीटी, व्हाेडाफाेन यांच्यासह अनेक कंपन्यांनी कपातीची याेजना जाहीर केली आहे.
आतापर्यंत गेल्या वर्षभरात ३.६० लाख कर्मचाऱ्यांनी नाेकऱ्या गमावल्या आहेत. जगभरात जानेवारी-डिसेंबर २०२२ या कालावधीत १ हजार ४६ कंपन्यांनी कपात केली. त्यांनी १.६१ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. तर, या वर्षी २ लाख कर्मचाऱ्यांना नारळ मिळाला आहे.
यामुळे हाेतेय कपात
माेठ्या प्रमाणावर नाेकर कपातीबाबत विविध कारणे सांगण्यात येत आहेत. त्यात गरजेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती, आर्थिक अनिश्चितता, व्यवसायात घट इत्यादी प्रमुख कारणे समाेर येत आहेत.
त्यामुळे कपातीचे सत्र काही काळ सुरूच राहणार आहे. मेटा, ॲमेझाॅन, पीएक्सटी, झेप्झ इत्यादी कंपन्या पुन्हा कपात करणार आहेत.
जिओ मार्टमध्ये कपात
‘जिओ मार्ट’ने एक हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सध्या १५ हजार कर्मचारी असून कंपनीला सुमारे ३ हजार कर्मचारी कमी करायचे आहेत.
डिस्ने आणखी अडीच हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात
अमेरिकेतील दिग्गज माध्यम आणि मनोरंजन कंपनी वॉल्ट डिस्ने कर्मचारी कपातीची तिसरी फेरी राबविणार असून, या फेरीत २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. कर्मचारी कपातीची ही फेरी पूर्ण एक आठवडा चालणार आहे.
एक महिन्यापूर्वी कंपनीने दुसऱ्या फेरीत ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्याआधी पहिल्या फेरीत ७ हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते.