Join us

प्रत्येक भारतीयाची कमाई $2730 वरुन $4730 होणार, निर्मला सीतारामन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:51 PM

भारताचे दरडोई उत्पन्न पुढील 5 वर्षांत $2000 ने वाढेल.

Indian Economy : भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा दावा भाजपकडून केला जातो. तर, देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न (Per Capita Income) अतिशय कमी असल्याची टीका विरोधक सातत्याने करतात. पण, आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दरडोई उत्पन्नाबाबत एक मोठा दावा केला आहे. पुढील 5 वर्षांत भारताचे दरडोई उत्पन्न $2730 वरुन वाढऊन $4730 होईल, असा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे.

दरडोई उत्पन्नात जोरदार वाढ शक्यकौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर भारताला $2730 दरडोई उत्पन्न गाठण्यासाठी 75 वर्षे लागली. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार, पुढील 5 वर्षांत दरडोई उत्पन्नात $2000 ची वाढ होईल. येत्या काही दशकांत सामान्य माणसाच्या जीवनशैलीत मोठा बदल होणार आहे. गेल्या दशकात आर्थिक आघाडीवर भारताची उत्कृष्ट कामगिरी, 5 वर्षात जगातील 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप, सातत्याने उच्च विकास दर आणि महागाईवर नियंत्रण ठेवल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारतासमोर अनेक आव्हाने त्या पुढे म्हणतात, संपूर्ण जग विभागले गेले आहे, अनेक ठिकाणी सातत्याने संघर्ष होताना दिसतोय. ही जागतिक शांततेसाठी धोक्याची बाब आहे. अशा परिस्थितीत भारताचे दरडोई उत्पन्न येत्या काही वर्षांत दुप्पट होणार आहे. 2000 च्या दशकात जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण अनुकूल असल्याने चीनसारख्या उदयोन्मुख बाजारपेठा सहजतेने वेगाने वाढू शकल्या. भारतासाठी हे मोठे आव्हान असले तरी, अनेक संधी येत आहेत. जागतिक परिस्थिती पूर्वीसारखी नाही, तरीही पुढील दशकात भारताचा वेगाने विकास होत राहील, असा दावाही निर्मला सीतारामन यांनी यावेळी केला.

टॅग्स :निर्मला सीतारामनभारतअर्थव्यवस्था