खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोने एअरबससोबत मोठा करार केल्याची माहिती दिली आहे. इंडिगो 500 Airbus A320 विमानांची खरेदी करणार आहे. ही खरेदी अशा वेळी होत आहे जेव्हा देशातील बहुतांश विमान कंपन्या विमान उद्योगात संघर्ष करत आहेत. तर दुसरीकडे आर्थिक अडचणींमुळे, GoFirst एअरलाइन ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे.
त्याचबरोबर काही कंपन्यांनी स्पाइसजेटच्या विरोधात दिवाळखोरीसाठी अर्जही केले आहेत. या कंपन्यांनी त्यांना भाडेतत्त्वावर विमाने दिली आहेत. अशा परिस्थितीत एअरबसला कोणत्याही विमान कंपनीनं दिलेली ही सर्वात मोठी विमानांची ऑर्डर आहे. या कराराच्या आर्थिक पैलूंचा तपशील अद्याप उघड झाला नसला तरी, असा अंदाजे हा करार ५० बिलियन डॉलर्सचा असू शकतो असं म्हटलं जातंय.
काय म्हटलं इंडिगोनं?इंडिगो एअरलाइन्सनं या ऑर्डरबद्दल माहिती देताना २०३० ते २०३५ दरम्यान विमानांची डिलिव्हरी अपेक्षित असल्याचं म्हटलं. ५०० विमानांची ही ऑर्डर केवळ इंडिगोची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर एअरबससह कोणत्याही विमान कंपनीनं केलेली एका वेळेची सर्वात मोठी खरेदीदेखील असल्याचं इंडिगोनं म्हटलेय. या विमानांच्या इंजिनची निवड कालांतरानं केली जाईल, यामध्ये A320 आणि A321 विमानांचा समावेश असेल, असंही कंपनीनं म्हटलंय. त्याचवेळी, दुसरीकडे कमर्शिअल एअरलाईन्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खरेदी असल्याचं ट्वीटही एअरबसनं केलंय. यापूर्वी एअर इंडियानं ४७० विमानांसाठी ऑर्डर दिली होती.