अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी समूहाच्या ९ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
अमेरिकेतील Hindenburg Research LLCने अदानी समूहाबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरवर परिणाम झाल्याचे उद्योग जगतात आणि शेअर बाजारात बोलले जात आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली.
अदानी कंपनीच्या शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकात सध्या चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी अचानक सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. २०२२मध्ये जगातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती होते.
जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात देखील गौतम अदानी यशस्वी झाले होते. मात्र २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही $१००.४ अब्जावर आली आहे.
बर्नार्ड अरनॉल्ट $२०० बिलियनसह अव्वल स्थानावर-
अव्वल अब्जाधीशांच्या यादीतील बदलानुसार, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. $२१५ अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले ठरले आहेत. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क १७०.१ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. Amazon सह-संस्थापक जेफ बेझोस हे $१२२.४ अब्ज संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
लॅरी एलिसन चौथ्या क्रमांकावर-
अब्जाधीश लॅरी एलिसन यांना गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीचा सर्वाधिक फायदा झाला आणि ते चौथ्या स्थानावर पोहोचले. त्यांची संपत्ती $११२.८ अब्ज इतकी वाढली. ज्यामुळे एलिसन हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे $ १०७.८ अब्ज संपत्तीसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत आणि बिल गेट्स $१०४.१ अब्ज संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी ११व्या क्रमांकावर-
यादीत समाविष्ट असलेल्या इतर नावांबद्दल बोलायचे झाले तर कार्लोस स्लिम $९३ अब्ज संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहेत आणि लॅरी पेज $८५ अब्ज संपत्तीसह यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.अब्जाधीशांच्या यादीत फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स $८३.९ अब्ज संपत्तीसह दहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. तर, भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ८३.१ अब्ज डॉलर्ससह जगातील ११ व्या क्रमांकावर आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"