अॅपच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करणारा प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) आता मोठा ब्रँड बनला असला तरी तो सुरू करताना कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. दीपिंदर गोयल यांनी एका किस्सा सर्वांसोबत शेअर करून आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली. तसंच त्यांनी धोरणांबाबत सरकारचे आभारही मानले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपिंदर गोयल यांचं कौतुक केलं.
"सध्याच्या भारतात कोणाच्याही आडनावाला महत्त्व नाही. दीपिंदर गोयल, इकडे कठोर मेहनतीला महत्त्व दिलं जातं. तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. हा प्रवास अनेकांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आम्ही स्टार्टअप मोठी होण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत कटिबद्ध आहोत," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून गोयल यांचं कौतुक केलं.
Deepinder Goyal, Zomato
— Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) (@HardeepSPuri) May 20, 2024
When I started Zomato in 2008, my father used to say “tu janta hai tera baap kaun hai” as my dad thought I could never do a start up given our humble background. This government and their initiatives enabled a small town boy like me to build something… pic.twitter.com/vogdM6v8oT
गोयल यांनी शेअर केला किस्सा
"जेव्हा मी २००८ मध्ये झोमॅटो सुरू केलं तेव्हा तुझे वडील कोण आहेत, हे तुला माहितीये ना असा प्रश्न वडिलांनी मला केला होता. कारण माझ्या वडिलांना आमची पार्श्वभूमी पाहता मी कधीच स्टार्टअप करू शकत नाही असं वाटत होतं. या सरकारनं आणि त्यांच्या पुढाकारानं माझ्यासारख्या छोट्या शहरातील मुलाला झोमॅटोसारखं काहीतरी तयार करता आले, जे आज लाखो लोकांना रोजगार देत आहे," असं झोमॅटोचे दीपिंदर गोयल म्हणाले.
"तू स्टार्टअप करू शकत नाहीस, असं त्यांचं म्हणणं होतं. मी पंजाबच्या एका लहान शहरातून आलोय. ही माझी पार्श्वभूमी असली तरी गेल्या १६ वर्षांमध्ये खूप काही बदललंय. विशेष करून गेल्या ७-८ वर्षांमध्ये, सरकारनं मार्ग मोकळा केला आहे आणि आता कोणत्याही अडचणी नाहीत. हे पुढेही कायम राहिल अशी मला अपेक्षा आहे," असं दीपिंदर गोयल यांनी नमूद केलं.