Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक्सची निवड करण्यात माहीर असलेले दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन वफे यांना अनेक जण 'मार्केट गुरू' मानतात.

By जयदीप दाभोळकर | Published: July 19, 2022 02:58 PM2022-07-19T14:58:11+5:302022-07-19T14:59:43+5:30

शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक्सची निवड करण्यात माहीर असलेले दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन वफे यांना अनेक जण 'मार्केट गुरू' मानतात.

In which sector does Market Guru Warren Buffett invest the most See how the investment turned in 20 years | 'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक्सची निवड करण्यात माहीर असलेले दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन वफे यांना अनेक जण 'मार्केट गुरू' मानतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचे कोट्स, शेअर बाजाराबद्दलची मतं, गुंतवणुकीबाबतच्या टिप्स अनेकांसाठी आदर्श आहेत. अशा तरुण गुंतवणूकदारांसाठी, बॅकशायर हॅथवेनं नुकताच शेअर केलेला व्हिडीओ मार्गदर्शक, दिशादर्शक ठरू शकतो. वॉरन बफे यांनी काळाची पावलं ओळखून आपला पोर्टफोलिओ कसा बदलला, हे यातून लक्षात येतंय. २००१ ते २०२१ या काळात ही चक्रं कशी फिरली, हे पाहणं रंजक आहे. उद्योजक हर्ष गोयंका यांनी बफे यांच्या गुंतवणूकीचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

बफे यांनी गेल्या २० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कशी गुंतवणूक वाढवली हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. २००१ मध्ये बफे यांची सर्वाधिक गुंतवणूक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्यांमध्ये होती. त्यांच्या एकूण गुंतवणूकीतील ४३.५ टक्के वाटा हा या कंपन्यांचा होता. तर फायनान्स कंपन्यांमध्ये किंवा वित्तीय क्षेत्रात त्यांची गुंतवणूक ही ४३.१ टक्के इतकी होती. एकूण गुंतवणुकीच्या केवळ १ टक्का रक्कम ते आयटी सेक्टरमध्ये गुंतवत होते. 

पुढील पाच वर्षांमध्ये त्यांनी ग्राहकोपयोगी कंपन्यांमधील आपली गुंतवणूक ४३.५ टक्क्यांवरून कमी करत ३७.८ टक्क्यांवर आणली आणि फायनान्स कंपन्यांतील गुंतवणूक ४३.१ टक्क्यांवरून ४७.९ टक्क्यांवर नेली. मात्र, हे चित्र २०१० च्या अखेरीला पुन्हा आधीसारखंच झालं. आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडे बफे यांचा फारसा कल नव्हता. २००९ च्या अखेरच्या तिमाहीत तर त्यांनी या क्षेत्रातील आपली संपूर्ण गुंतवणूकच काढून घेतली होती. 

आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली
२०१० ते २०१५ या कालावधीत बफे यांनी आपली आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली. या कालावधीत त्यांनी आपली या क्षेत्रातील गुंतवणूक १ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणली. येणारा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा असेल हे त्यांनी अचूक हेरलं होतं. याउलट, रिअल इस्टेटमधून त्यांनी आपली गुंतवणूक शून्य केली. कन्झ्युमर गुड्स सेक्टरवरील त्यांचा विश्वास कायम होता. पुढील पाच वर्षांमध्ये त्यांनी ही गुंतवणूक कमी केली. २०२० च्या अखेरच्या तिमाहित ती १३.२ टक्क्यांवर आणली. तर आयटी क्षेत्रातील गुंतवणूक तब्बल ४१.१ टक्के इतकी केली. बफे यांचं फायनान्स सेक्टरवरचं प्रेम कायम आहे. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहित त्यांनी आयटी क्षेत्रातील गुंतवणूक आणखी वाढवत ती ४३.४ टक्क्यांवर आणली. तर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी केल्याचं पाहायला मिळतं.


वडिलांच्या कंपनीत केलं काम
बफे यांनी शिक्षणानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं काम सुरू केलं होतं. त्यांनी ओमाहा येथे आपल्या सिक्योरिटिजची विक्री करणाऱ्या आपल्या वडिलांच्या कंपनीत कामाला सुरूवात केली. त्यांना प्रोफेसर आणि इन्व्हेस्टर ग्राहम यांनी जे सल्ले दिले त्यांचं पालन केलं. यानंतर १९५४ मध्ये ग्राहम यांनी त्यांना आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली. बफे यांनी ग्राहम यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये दोन वर्ष कामही केलं. त्यानंतर बफे यांनी ओहामा येथे परत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याला सर्वात जास्त जे काम आवडतं तेच करण्याचा सल्ला ग्राहम यांनी बफेंना दिला होता. ज्यावेळी ते ओहामा येथे परतले तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसेही जमा झाले होते. त्याचाच त्यांनी पुढे वापर केला. आज बफे यांचं नेटवर्थ जवळपास ९६ अब्ज डॉलर्स इतकं आहे.

Web Title: In which sector does Market Guru Warren Buffett invest the most See how the investment turned in 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.