Join us

Tata Chemicals ला आयकर विभागाकडून १०३ कोटी रुपयांचा दंड; शेअरची स्थिती काय? पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:22 PM

Tata Chemicals share price : आयकर विभागाने टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सला 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाहा काय आहे यामागचं कारण.

Tata Chemicals share price : आयकर विभागाने टाटा समूहाची (Tata Group) कंपनी टाटा केमिकल्सला  (Tata Chemicals) 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्याज नाकारण्याशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतरही कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये 2.14%ची वाढ होऊन तो 1,057.05 रुपयांवर पोहोचला. कंपनीचं मार्केट कॅप 26,369.82 कोटी रुपये आहे. 

कंपनीला आयकर विभागाच्या राष्ट्रीय फेसलेस असेसमेंट सेंटरकडून ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये, आयकर कायद्याच्या कलम 270A (3) अंतर्गत कलम 36(1) अंतर्गत व्याज नाकारल्याबद्दल 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती गुरुवारी टाटा केमिकल्सनं दिली.  

प्रचलित कायदा आणि वकिलांच्या सल्ल्यानुसार, या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय फेसलेस अपील केंद्राकडे (अपील प्राधिकरण) अपील करण्याची त्यांची योजना आहे. अपील अधिकाऱ्यांकडून अनुकूल आदेशाची अपेक्षा असल्याचंही कंपनीनं पुढे सांगितलं. 

कशी होती शेअरची कामगिरी? 

टाटा केमिकल्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,349.70 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 922.20 आहे. गेल्या एका महिन्यात टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झालीये. परंतु गेल्या 6 महिन्यांत स्टॉकची कामगिरी फ्लॅट आहे. या शेअरनं या वर्षी आतापर्यंत 7 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात केवळ 7 टक्के परतावा दिला. मात्र, गेल्या 5 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 303 टक्के नफा झालाय. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारइन्कम टॅक्स