लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीतील प्रसिद्ध रॉयल प्लाझा हॉटेलचे अध्यक्ष अशोक मित्तल यांच्या मुंबई, दिल्ली, दमण येथील कार्यालये आणि हॉटेल अशा एकूण १८ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने शनिवारी छापेमारी केली. मित्तल यांनी सुमारे ४० कोटी रुपयांचे परदेशी उत्पन्न लपविल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या परदेशी मालमत्ता अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुलभ कर प्रणाली सुविधा उपलब्ध असलेल्या काही देशांत मित्तल यांनी काही पैसे ठेवल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. यामध्ये रॉयल प्लाझा हॉटेल, मित्तल यांच्या अन्य कंपन्या तसेच बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आदींचा समावेश आहे. या छापेमारीदरम्यान परदेशातील आर्थिक व्यवहारांची अनेक कागदपत्रे तसेच संगणकातून महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला आहे. परदेशात कमोडीटी उद्योगांत कार्यरत असलेल्या काही कंपन्यांत मित्तल यांनी पैसे गुंतविल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट होत असल्याचेही विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही रक्कम ४० कोटी रुपयांच्या घरात आहे. या कंपन्यांत त्यांनी नेमका किती पैसा गुंतवला, तो कधी गुंतवला आणि त्या गुंतवणुकीवर किती नफा मिळाला, याची माहिती मित्तल यांनी प्राप्तिकर विवरणामधे नमूद केली नव्हती. तसेच, परदेशात काही ठिकाणी स्थावर मालमत्ताही त्यांनी खरेदी केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे, याचीदेखील नोंद त्यांच्या प्राप्तिकर विवरणामध्ये करण्यात आलेली नव्हती. तसेच, मलेशिया येथील काही कंपन्यांद्वारे त्यांनी भारतात हॉटेल उद्योगात पैसा वळविल्याचाही विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
३० कोटींचा राखीव माल प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी दरम्यान, संगमरवर, लाईटस् या त्यांच्या उद्योगाशी निगडित काही कागदपत्रेदेखील ताब्यात घेतली. या व्यवसायात एकूण विक्रीपैकी ५० ते ७० टक्के व्यवहार हे रोखीने झाल्याचेही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्याचीदेखील चौकशी आता करण्यात येत आहे. तर, जाहीर न केलेला ३० कोटी रुपयांचा राखीव माल असल्याचेदेखील आढळून आले आहे.